Pimpri News: महापालिकेच्या बक्षीस योजनेस गुणवंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरिता एक महिन्याची मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील इतर कल्याणकारी योजने अंतर्गंत दहावी आणि बारावीच्या 80 टक्के गुण संपादन करणा-या विद्यार्थ्यांना बक्षिस रक्कम देण्याच्या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

महापालिकेच्या नागरवस्ती विभागातर्फे दहावी, बारावीच्या 80 टक्क्यांहून गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येते. या योजनेसाठी विहीत नमुन्यातील फॉर्म, रहिवासी दाखला,आधार कार्ड,  गुणपत्रिका, विद्यार्थ्याचे किंवा पालकाचे राष्ट्रीयीकृत बॅकेतील खाते व पास बुकची झेरॉक्स, प्रवेश घेतलेल्या संस्थेतील मुख्याध्यापक / प्राचार्य यांची शिफारस  इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात.

कोरोनामुळे महाविद्यालये सुरु झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे शिफारस पत्र मिळाले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची कागदपत्रे गोळा झालेली नाहीत. कागदपत्रे मिळविण्यास वेळ लागत आहे. महाविद्यालये दिवाळीनंतर सुरु होण्याची शक्यता आहे. या योजनेची मुदत 30 सप्टेंबर 2021 रोजी संपत होती. त्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

या योजनेला मुदतवाढ देण्याची सूचना उपमहापौर हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासनाला केली होती. महापालिका प्रशासनाने या योजनेला एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.  त्यामुळे गुणवंत विद्यार्थी 30 ऑक्टोबरपर्यंत बक्षीस योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करु शकणार आहेत.

महापालिकेचे समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे म्हणाले, ”विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाहीत. बक्षीस योजनेपासून एकही गुणवंत विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. यासाठी दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरिता एक महिन्याची म्हणजेच 30 ऑक्टोबरपर्यंत  मुदतवाढ देण्यात आली आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.