Interview with Dr. Sunita salve: कोविडने जीवनाची मूल्ये शिकवली

शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यात महिलांचे मोठे योगदान

एमपीसी न्यूज ( गणेश यादव ) :  कोरोना महामारीत परिचारिका, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या सर्वांनी कोणतेही वेळेचे बंधन न पाळता, भीती न बाळगता, स्वत:चा आणि घरच्यांचा जीव धोक्यात घालून काम केले. महिला सचोटीच्या, मेहनती, त्यांची काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असते. या तीन गोष्टींमुळे कोरोना काळातील कामगिरीत महिला उजव्या ठरलेल्या आहेत. घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून पंधरा-पंधरा तास महिलांनी काम केले. शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यात महिलांचा फार मोठा सहभाग असल्याचे पालिकेच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे यांनी सांगितले. कोविडने जीवनाची मूल्ये शिकवली. सर्वांना समानता दाखविली. उच्चभू लोकांचा खासगी डॉक्टरांवर असलेला विश्वास कोविडने तोडला आहे. सगळे उच्चभू लोक धावत पळत सरकारी यंत्रणेकडे आले, असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाच कोविड केअर सेंटरची धुरा यशस्वीपणे पार पडणाऱ्या, कोरोना योध्या आकुर्डी रुग्णालयाच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे यांच्याशी ‘एमपीसी न्यूज’चे प्रतिनिधी गणेश यादव यांनी संवाद साधला.

प्रश्न – सात महिन्यापासून तुम्ही कोरोनात काम करत आहात. तुमचा अनुभव कसा आहे?

उत्तर – पालिका कर्मचारी, नागरिकांसाठी अत्यंत कठीण काळ होता. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना सगळे नवीन होते. कोरोना आजार नवीन होता. त्यादृष्टीने कामाचे व्यवस्थापन संपूर्ण नवीन होते. शहरात पहिला रुग्ण सापडल्यानंतर कोरोना झपाट्याने वाढत होता. नियोजनापेक्षा अचानक जास्त रुग्ण सापडले. त्यामुळे प्रचंड दबाव आला. रुग्णांचे नियोजन कसे करायचे, कोविड सेंटर सुरू करायचे. कोविड केअर सेंटर म्हणजे काय येथपासून सुरुवात केली. ‘पीसीसीईओ’ कॉलेज मधिल सेंटर सुरू झाल्यानंतर अचानक एका सकाळी आयुक्तांचा फोन आला. तिथे जायला सांगितले.

आनंदनगर येथील 11 रुग्ण आणि एक इमारत माज्या ताब्यात दिली आणि सीसीसी सेंटर सुरू करण्यास सांगितले. डिसीएचसी, डीसीएच म्हणजे काय या पासून सुरुवात केली. पीसीसीईओ, आरटीपीसी, ईएसआय हॉस्पिटल आणि घरकुल मधील दोन असे पाच सेंटर माज्याकडे होते. त्याचे नियोजन, आवश्यक साहित्य देणे. प्रत्येक रुग्णांकडे माझा फोननंबर होता. जेवण, पाणी, औषधांपासून रुग्णांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या. रात्री-अपरात्री रुग्णांचा फोन येत असत. सर्व डॉक्टरांचे सहकार्य, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी वेळोवेळी खूप मदत केली. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार यांनी मोलाचे सहकार्य केले. फिल्डवर काम करणाऱ्या परिचारिका, आरोग्य सेवक, पीएमपीएमलचे कर्मचारी सर्वांनी मेहनतीने झोकून देऊन सचोटीने काम केले. त्यामुळेच शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

प्रश्न – तुमच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या किती रूग्णांवर उपचार केले. किती बरे होऊन घरी गेले?

उत्तर – आतापर्यंत कोविड सेंटरमध्ये साधारण 37 हजार रुग्णांची चाचणी केली. त्यातील पाच हजार रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल झाले होते. उपचार घेऊन ते बरे होऊन घरी गेले आहेत. अजूनही रूग्णांवर उपचार चालू आहेत.

प्रश्न – तुमच्या रुग्णालयात किती दुर्गा काम करत आहेत?

उत्तर – आमची ‘अ’ प्रभाग आणि आकुर्डी दवाखान्याची टीम आहे. त्यामध्ये 80 टक्के आम्ही महिला कर्मचारी आहोत. त्यात सर्वाधिक परिचारिका आहेत. शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या सर्वांनी कोणतेही वेळेचे बंधन न पाळता, भीती न बाळगता, स्वतःचा आणि घरच्यांचा जीव धोक्यात घालून काम केले. रात्री, अपरात्री, बारा वाजता देखील आशा वर्कर माझ्यासोबत आल्या आहेत. पळून गेलेल्या झोपडपट्टीतील पॉझिटिव्ह रुग्णांना रात्री बारा वाजता रुग्णालयात आणले आहे. पीपीई किट, मास्कसह विविध सामुग्री नसताना अशा काळात माझ्यासोबत परिचारिका, आशा वर्कर यांनी काम केले आहे. रात्री बारा वाजता बोलवले. तरी पतीसोबत त्या हजर होत असत.

प्रश्न – कोरोनाच्या लढाईतील महिलांच्या योगदानाबद्दल काय सांगाल?

उत्तर – कोरोना महामारीत काम करणाऱ्या सगळ्या महिलांना माझा मानाचा मुजरा आहे. महिला सचोटीच्या, मेहनती, त्यांची काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असते. या तीन गोष्टींमुळे त्या उजव्या ठरलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात अधिकारी, कर्मचारी कोणत्याही महिलेच्या घरी कामवाले नोकर येत नव्हते. अशावेळी घराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून पंधरा पंधरा तास काम केले आहे. दररोज नवीन अडचणी, आव्हाने येत होती. पण, त्याला सामोरे जाताना कोणीही डगमगले, कोणती कारणे सांगितली नाहीत की सुट्टी मागितली नाही. त्यावर मात करत महिलांनी काम केले. शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महिलांचा फार मोठा सहभाग आहे.

प्रश्न – आजार नवीन होता. सुरुवातीला काम करताना भीती वाटली का?

उत्तर – हो, नक्कीच सुरुवातीला भीती वाटली. पण, कोविडकडे बघताना आपण सर्व वाईटच गोष्टी बघितल्या. चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. कोविडने जीवनाची मूल्ये शिकवली आहेत. जवळचे, घरातील लोकांशी आलेला दुरावा लॉकडाऊनच्या काळात मिटलेला आहे. आपल्या तब्येतीची काळजी, खाणे, पिणे, झोपणे लाइफस्टाइल जोपासणे फार गरजेचे आहे. सुरक्षित अंतर, मास्क वापरणे. यामुळे आपली स्वच्छता आपण ठेवायची आहे. सुरक्षित अंतर राखायचे आहे. याबाबत नागरिकांमध्ये शिस्त निर्माण झाली आहे. कोविडने सर्वांना समानता दाखविली आहे. कितीही मोठा असो की छोटा, कोरोना झाला तर एकच उपचार असतात. खूप पैसा, खासगी डॉक्टरांवर विश्वास असलेल्या उच्चभ्रू लोकांचा कोविडने विश्वास तोडला आहे. सगळे उच्चभ्रू लोक धावत पळत सरकारी यंत्रणेकडे आले.

प्रश्न – कोरोनाची दररोज नवीन लक्षणे सांगितली जात होते. तुम्ही आव्हान कसे पेलले?

उत्तर – प्रत्येक गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला.पुस्तकी अभ्यासापेक्षा रुग्ण बघणे, त्यांची तपासणी करून लक्षणे ओळखणे. आम्ही सर्व डॉक्टर रात्री रुग्णाच्या लक्षणाबाबत चर्चा करत होतो. नियमावली सोबत प्रत्यक्ष कामाचा मोठा उपयोग झाला. माज्यासह सर्व डॉक्टर रात्री दहापर्यंत दवाखान्यात असत. अभ्यास करून, नवीन नवीन बदलावर काम करून आव्हान यशस्वीरीत्या पेलू शकलो. यामध्ये सर्वात मोठा सहभाग आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा होता. आयुक्त डॉक्टर नसले. तरी आमचे सुपर कन्सल्टंट होते. आमच्यापेक्षा त्यांचा जास्त अभ्यास होता. वेळोवेळी मार्गदर्शन केले. दररोज बैठका घेत व्यवस्थित नियोजन केले. मोठी अडचण आल्यास आम्ही रात्री बारा वाजता फोन केला. तरी तो स्वीकारून आयुक्तांनी मार्गदर्शन केले आहे. शहराची परिस्थिती सुधारण्यात आयुक्तांचा फार मोठा वाटा आहे.

प्रश्न: कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले का?

उत्तर – सहकारी कर्मचाऱ्यांचे अपेक्षापेक्षा तिप्पट सहकार्य मिळाले. सर्वांनी इमानदारीने काम केले. 58 वर्षांच्या भांडारपाल महिलेने देखील कोरोनात काम केले. पॉझिटिव्ह आल्या. उपचार घेतल्यानंतर पंधराव्या दिवशी परत कामावर रुजू झाल्या. एकही दिवस जास्तीची सुट्टी घेतली नाही.

प्रश्नः सात महिन्यापासून कोरोना कालावधीत सलग काम करतात. कोविड सेंटर, रुग्णालयात जावे लागते. कामाचा
ताण येत नाही का?

उत्तर – हो कामाचा ताण आला. पण, शहराची कोरोना रुग्णसंख्येबाबत परिस्थिती जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात भयानक होती. त्यामुळे रात्रीची झोप येत नसे. स्वतःचा शारीरिक थकवा, ताण याकडे कधीच लक्ष गेले नाही. कारण, रुग्णसंख्या प्रचंड होती. प्रत्येक रुग्णांची वेगळी समस्या होती. ते सहजतेणे सोडविण्याची देवाने ताकत दिली. मी स्वतः खूप आजारी असते. पण कोरोनाकाळात  मला कोणताही त्रास झाला नाही.

प्रश्नः घर आणि रुग्णालय कामाचे नियोजन कसे करता?

उत्तर – मागील सात महिने मी घराकडे अजिबात लक्ष दिले नाही. घरच्यांनी सगळे ऍडजस्ट केले. घरात लागणारे साहित्य आणले. अगदी माझी औषधे देखील घरच्यांनीच आणली आहेत. सर्व सहकार्य केले. घराचा कोणताही ताण येवू दिला नाही. त्यामुळे मी संपूर्ण वेळ दवाखान्याच्या कामासाठी देवू शकले.

प्रश्न: तुमच्या सोबतचे किती कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले?

उत्तर – माझ्यासोबत काम करणारे 35 कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते. त्यातील सगळे बरे झाले आहेत. सर्वजण 14 दिवसात  कामावर हजर झाले आहेत.

प्रश्नः रुग्णसंख्या घटली. त्याचे नेमके कारण काय सांगता येईल?

उत्तर- कोविड पूर्णपणे गेला नाही. पण, अनेकजण कोरोनाचा संसर्ग होऊन बरे झाले आहेत असे वाटत आहे. अनेकांमध्ये अँटीबॉडी तयार झालेल्या आहेत असे दिसून येते. चाचण्यांचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. पॉझिटिव्ह आलो का 14 दिवस कोविड सेंटरमध्ये ठेवातात अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक पुढे येत नाहीत. जून, जुलैमध्ये लोक तपासणीसाठी स्वतः पुढे येत होते. आता लोकांमधील भीती कमी झाली आहे. कोविडमुळे काहीच होत नाही, असा लोकांचा भ्रम झाला आहे. पण, हे पूर्णपणे चुकीचे आहे. नागरिक मास्क वापरत नाहीत. सुरक्षित अंतर बाळगत नाहीत. सॅनिटाइझर वापरण्याचे प्रमाण शून्य झाले आहे. ही धोक्याची लक्षणे आहेत. दसरा, दिवाळी सण तोंडावर आहेत. या सणांमध्ये नियम पाळले नाहीत. तर, नोव्हेंबर अखेर पुन्हा शहराची परिस्थिती बिकट होऊ शकते. ती होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घेतली. तर, आपण नक्कीच  चांगल्या रीतीने बाहेर पडू शकतो.

प्रश्न: नागरिकांना काय आवाहन कराल?

उत्तर – आवाहन नाही. माझी प्रार्थना आहे. स्वत:च्या तब्येतीची, कुटूंबाची काळजी घ्या. सणाचा आनंद घ्या. पण, सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका. वारंवार हात धुवत रहा, मास्क आणि सुरक्षित अंतर याचे काटोकोर पालन करावे. हे जर केले नाही. तर, शहराची परिस्थिती परत वाईट होण्यास वेळ लागणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III