सोमवार, फेब्रुवारी 6, 2023

IPL 2021 : पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराजची झुंजार खेळी; मुंबई समोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज – आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे दुसरे सत्र आजपासून सुरू झाले आहे. सत्रातील पहिलाच सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात सुरू आहे. दमदार कामगिरीची अपेक्षा असलेल्या चेन्नईने सुरवातीला निराशा केली. पण, पिंपरी-चिंचवडच्या ऋतुराज गायकवाडने दमदार खेळी करून चेन्नईचा डाव सावरला. सलामीला आलेल्या ऋतुराजने 58 चेंडूचा सामना करत धावा 88 केल्या. यामध्ये 4 षटकार आणि 9 चौकार यांचा समावेश आहे.

ऋतुराज गायकवाडने केलेल्या 88 आणि रविंद्र जडेजाने केलेल्या 26 धावांच्या जोरावर चेन्नईने 156 धावापर्यंत मजल मारली. मुंबईला आता 157 विजयासाठी धावांची गरज आहे.

चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात सलामीवीर फाफ ड्युपलेसिस भोपाळाही न फोडता झेलबाद झाला. त्यानंतर मोईन अली देखील शुन्यावर बाद झाला. सुरेश रैना अवघ्या चार धावा करुन तंबूत परतला. ब-याच कालावधीनंतर मैदानात आलेल्या एम. एस. धोनी कडून चेन्नईच्या संघाला खूप अपेक्षा होती. मात्र, एम. एस. धोनी देखील वैयक्तिक तीन धावांवर बाद झाला.

त्यानंतर अष्टपैलू रविंद्र जडेजाने ऋतुराज गायकवाड सोबत चांगली भागीदारी करत धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. रविंद्र जडेजा 26 धावा करून झेलबाद झाला. ड्वेन ब्राव्होने आपला करिष्मा दाखवत 3 चौकार लगावत 23 धावा केल्या. शार्दूल ठाकूरने 1 धाव केली. मुंबईकडून बोल्ट, बुमराह आणि मिलने यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

सहाव्या षटकात 24 धावांवर चार अशी संघाची अवस्था असताना ऋतुराज गायकवाडने दमदार खेळी करत मुंबई समोर 157 धावांचे आश्वासक आव्हान उभे केले आहे.

Latest news
Related news