Kolhapur News : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी  

करुणा मुंडे यांना मिळाली एवढी मते!

एमपीसी न्यूज – 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव विजयी झाल्या. 19 हजार 307 मताधिक्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

विजयी उमेदवार जयश्री जाधव यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक नारायण स्वामी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कापसे, संतोष कणसे, रंजना बिचकर आदी उपस्थित होते.

विजयी उमेदवार श्रीमती जाधव यांना प्रमाणपत्र देतेवेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री जाधव यांना 97 हजार 332 तर भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना 78 हजार 25 इतकी मते मिळाली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या करुणा धनंजय मुंडे यांचा देखील दारूण पराभव झाला आहे. करुणा मुंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली असून त्यांना केवळ 134 मते मिळाली आहेत. तर नोटाला 1 हजार 799 मते मिळाली असून 39 मते बाद झाली आहेत. या एका जागेसाठी 15 जणांनी आपले नशीब आजमावले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.