Kamshet : गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – गोवित्री विकास सोसायटीच्या संचालकाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील गोवित्री येथे घडली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळमध्ये राजकीय वातावरण तापल्याची चर्चा सध्या मावळात सुरु आहे.

प्रवीण बाळू जाधव (वय 22, रा. गोवित्री, ता. मावळ) यांनी याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल बाळासाहेब नेवाळे, प्रणेश बंडू नेवाळे, अमोल नाथ नेवाळे, रोहिदास कुंडलिक शेवाळे (सर्व रा. गोवित्री, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आरोपी राहुल नेवाळे याने फिर्यादी जाधव यांना फोन करून घराच्या बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी एम एच 14 / 8182 या कारमधून जाधव यांचे अपहरण केले. आरोपींनी जाधव यांच्याकडे त्यांच्या वडिलांची चौकशी केली. जाधव यांचे वडील दोन दिवसांपूर्वी पुण्यात बहिणीकडे गेले असल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी पुण्यात जाण्याचा आग्रह धरला. त्यासाठी जाधव यांनी नकार दिला असता आरोपींनी जाधव यांना पालेनामा येथे एका बंगल्यावर नेऊन खुर्चीला बांधून टाकले. आरोपी अमोल, रोहिदास यांनी लाकडी दांडक्याने तर राहुल याने वायरने जाधव यांना मारहाण केली.

आरोपींनी जाधव यांना त्यांच्या वडिलांच्या बेपत्ता होण्याची खोटी तक्रार कामशेत पोलीस ठाण्यात देण्यास सांगितले. तक्रार न दिल्यास जाधव यांच्या आई, बहीण व वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानुसार, जाधव यांनी कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर, आरोपींनी त्यांच्या कारमधून जाधव यांना घरी सोडले. घरी आल्यानंतर जाधव यांनी घरच्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला असल्याचे जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.