Chakan News : बिबट्याचे हल्ले सुरूच ; पारडू ठार; नागरिकांनी धरले वन विभागाला धारेवर

एमपीसी न्यूज – चाकणजवळील राक्षेवाडी येथे मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात शिरून एका म्हशीच्या पारडाला ठार केले.बिबट्याच्या या आणखी एका हल्ल्याने राक्षेवाडी येथे राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरली आहे.वनविभागाच्या अधिकार्यांना स्थानिक नागरिकांनी धारेवर धरत तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

काल मध्यरात्री बिबट्याने राक्षेवाडी भागात चांगलाच धुमाकूळ घातला.गोठ्यात बिबट्या शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित शेतकर्याने गोठ्याच्या पत्र्यांवर दगडी मारून बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला.मात्र बिबट्याने म्हशीचे पारडू ठार केले. सकाळी घटनास्थळी आलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

निसर्गाच्या सानिध्यात राहणारा बिबट्या लोकांच्या वस्तीत धाव घेऊ लागल्याने चाकण लगतच्या राक्षेवाडी भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.खेड तालुक्यात सर्वच ठिकाणच्या शेतावरच्या वस्त्या आणि बिबट्या असे नवे समीकरण निर्माण झाले आहे.बिबट्याच्या पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.चाकण शहराला लागून असलेल्या शेतवस्त्या बिबट्याचे दर्शन आणि सतत होणारे हल्ले यामुळे भयभीत झाल्या आहेत.शहरांच्या जवळील वस्तीत बिबट्याचे हल्ले वाढल्याने वन विभागाची देखील डोकेदुखी वाढली आहे.

खेड तालुक्यात पोषक वातवरण  
झुडपी जंगल आणि उसाचे क्षेत्र असल्याने राक्षेवाडी आणि लगतच्या भागात बिबट्यांचे वास्तव्य वाढले आहे.या भागात बिबट्यांना पोषक वातावरण मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी उसाचे क्षेत्र मोठे असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी चांगली जागा मिळाली आहे.शेतीत काम करताना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे, मात्र शेतकरी आणि मजुरांनी देखील काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन चाकण वन विभागाच्या अधिकारी दिपाली रावते, एस.सी.आगरकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.