एमपीसी न्यूज – डोंगरगाव कुसगाव येथील प्रलंबित असलेली पाणी पुरवठा योजना लवकर मार्गी लावण्याची मागणी पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत यांनी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
डोंगरगाव कुसगावसाठी प्रादेशिक पाणी योजना 2006 साली प्रस्तावित करण्यात आलेली होती. परंतु 2009 साली प्रत्यक्षात सुरवात झालेल्या या कामाने या भागातील पाणी प्रश्न मिटला नाही, म्हणुन ग्रामस्थांच्या मागणीनुसार 2015 साली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन वाढीव प्रादेशिक पाणी योजना प्रस्तावित केली. लोकसंख्येतील वाढ लक्षात घेत कामाला मंजुरी मिळाली, परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सदरची योजना कागदावरच राहिल्याने परिसरातील गावांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सदर पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित पुर्ण करण्याची मागणी पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत यांनी केली आहे.
लोणावळा शहरालगत असल्याने झपाट्याने नागरिकीकरण होत असलेल्या कुसगाव डोंगरगाव या गावात पाणी पुरवठा योजना पुर्ण न झाल्याने पाण्यासाठी पायपीट करत पाणी आणावे लागत आहे. तसेच उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने प्रलंबित पाणी पुरवठा योजनेचे काम त्वरित पुर्ण होणे गरजेचे आहे.
पाणी योजना अद्याप पुर्ण न झाल्याने स्थानिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही योजना तातडीने पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करुन लवकरच मार्गी लावणार असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.
पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत, कुसगाव विकास सोसायटीचे चेअरमन संतोष राऊत, संचालक लक्ष्मण केदारी, मधुर मुंगसे, चिन्मय कुटे, सदाशिव सोनार, हरिश्चंद्र गुंड, हनुमंता भोसले यांनी निवेदन दिले.