LSG vs KKR : लखनऊ संघाने केकेआरवर मिळवला दणदणीत विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : लखनऊ सुपर जायंट्सची आयपीएल 2022 मधली दमदार कामगिरी कालही तशीच लक्षवेधी चालूच राहीली. आणि त्यांनी मजबूत अशा कोलकाता नाईट रायडर्स संघाला 75 धावांची मात देत आणखी एक विजय मिळवून आपली विजयी घोडदौड चालूच ठेवली आहे.

काल पुण्याच्या गहूंजे मैदानावर झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा पण तो खूप घातकी ठरला.लखनऊ सुपर जायंट्सने या निर्णयाला सहर्ष स्वीकारत प्रथम फलंदाजी करताना आपल्या 20 षटकात 7 गडी गमावून 176 धावांचा चांगला स्कोअर उभा केला.

डीकॉकचे  अर्धशतक ,दीपक हुडा,स्टोयनिस, पंड्याची उपयुक्त फलंदाजी यामुळे लखनऊ सुपर जायंट्सने  176 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले, आणि नंतर या धावसंख्येचा जोरदार बचाव करत बलाढ्य म्हणवल्या जाणाऱ्या कोलकाता संघाला केवळ 101 धावातच गुंडाळून एक मोठा विजय मिळवला.

कृनाल पंड्या आणि होल्डरची भेदक गोलंदाजीने केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले,आणि आपल्या संघाला 75 धावांनी मोठा विजयही मिळवून दिला.हा लखनऊ संघासाठी  11 व्या सामन्यातला आठवा विजय असल्याने आणि त्यांचा रनरेटही चांगला असल्याने त्यांनी अंकतालिकेत प्रथम क्रमांकही मिळवला आहे.
त्याआधी लखनऊ संघाला प्रथम फलंदाजी करताना  पहिल्याच षटकात धक्का बसला,जबरदस्त फॉर्मात असणारा के एल राहुल डावाच्या पहिल्याच षटकात धावबाद झाला.

मात्र त्यानंतर डीकॉक आणि हुडा यांनी जबरदस्त फलंदाजी करत डावाला चांगलाच आकार दिला.डीकॉकने केवळ 29 चेंडूत 3 षटकार आणि चार चौकार मारत आपल्या अर्धशतकाला गवसनी घातली, मात्र अर्धशतक पूर्ण करुन तो लगेचच सुनील नारायणच्या गोलंदाजीवर बाद झाला,त्यानंतर कृनाल पंड्या आणि दीपक हुडानेही एक छोटी पण उपयुक्त भागीदारी करत लखनऊ संघाला मोठ्या धावसंख्येची आस दाखवली.

हुडानेही 41 धावांची छोटी पण महत्वपूर्ण खेळी केली.त्याला रसेलने बाद केले.या चांगल्या सुरुवातीचा उत्तम फायदा उचलत स्टोयनिस, पंड्या,बदोनी आणि होल्डरने छोट्या छोट्या पण उपयुक्त धावा केल्या आणि संघाला 176 धावांची चांगली धावसंख्या गाठून दिली.केकेआर कडून रसेलनी दोन ,तर साऊदी,नराईन यांनी प्रत्येकी एकेक गडी बाद केला.

उत्तरादाखल खेळताना कोलकाता संघाची सुरुवात अतिशय खराब झाली,मोहसीन खानने डावाच्या पहिल्याच षटकात बाबा इंद्रजितला बाद करुन केकेआरला पहिला धक्का दिला.यावेळी केकेआरच्या नावावर एकही धाव नव्हती,यानंतर फक्त 11 धावा फलकावर असताना श्रेयस अय्यरही फक्त 6 धावा करून चमीराच्या गोलंदाजीवर बाद झाला,आणि केकेआरला फार मोठा हादरा बसला.या धक्क्यातून सावरण्याआधीच फिंच ,आणि भरोशाचा नितीश राणा सुद्धा स्वस्तात बाद झाला आणि केकेआरची अवस्था चार बाद 25 अशी बिकट झाली. आणि केकेआर संघ एकदम अडचणीत सापडला.

यानंतर रिंकू सिंघ आणि रसेलने हातपाय हालवायला सुरुवात केली.रसेलनी तर दांडपट्टा चालवावा तशी बॅट चालवायला सुरुवात केली, पण या प्रयत्नात तो कधीही बाद होवू शकतो,याची खात्री राहुलला असल्याने तो याची जराही फिकीर करत नव्हता आणि झालेही तसेच. 45 धावांची  भागीदारी झाल्यानंतर रिंकू सिंग बिष्णोईच्या गोलंदाजीवर बाद झाला. आणि पाठोपाठ 19 चेंडूत 5 षटकार आणि तीन चौकार मारून जमवलेल्या 45 धावावर रसेल आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि त्याबरोबरच केकेआरची जिंकण्याची एकमेव आशाही संपुष्टात आली.

यानंतर अपेक्षित विकेटस एकापाठोपाठ एक पडल्या आणि केकेआर संघ फक्त 101 धावामध्येच गारद झाला.यातही लाजिरवाणी गोष्ट अशी होती की केकेआर संघ फक्त 14.3 षटकेच प्रतिकार करु शकला.लखनऊ साठी  आवेश खान आणि होल्डर यांनी प्रत्येकी तीन तीन बळी घेत केकेआरच्या फलंदाजांना स्थिरावू दिलेच नाही. या विजयाने लखनऊ संघाला अंकतालिकेत थेट प्रथम क्रमांकावर विराजमान केले आहे.

संक्षिप्त धावफलक

लखनऊ सुपर जायंट्स
7 बाद 176
डीकॉक 50,हुडा 41,पंड्या 25,स्टोयनिस 28
रसेल 22/2,साऊदी 25/1
विजयी विरुद्ध

कोलकाता नाईट रायडर्स
सर्वबाद 101
रसेल 45,नाराईन 22,फिंच 14
आवेश खान 19/3,होल्डर 31/3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.