Manobodh by Priya Shende Part 24 : मनोबोध भाग 24 – रघुनायकावीण वाया शीणावे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक चोवीस

रघुनायकावीण वाया शीणावे

जना सारखे व्यर्थ का वोसणावे

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे

अहंता मनी पापिणी ते नसो दे

मागच्या श्लोकात समर्थांनी मनाला सांगितलं की, ” न बोले मना राघवावीण काही” म्हणजे की तू राघवा शिवाय काही बोलू नकोस. म्हणजेच सतत त्याच नाम मुखात राहू देत.

आता ह्या श्लोकात ते म्हणत आहेत की, “रघुनायकावीण वाया शीणावे”, म्हणजे रघुनायका खेरीज ,त्याच्या नामाशिवाय,जे काही करशील, बोलशील, ते सगळं व्यर्थ आहे. त्याने फक्त शीणच होणार आहे.

संसारासाठी माणूस फार कष्ट घेतो. अत्यंत राबतो. मी आणि माझं कुटुंब सुखी राहू देत,  यासाठी अत्यंत काबाडकष्ट करतो. पण यामध्ये ऐहिक सुखप्राप्ती हा एकमेव विचार असतो.  म्हणजे राहायला चांगला बंगला असू दे. घालायला चांगले कपडे असू दे. फिरायला चांगली गाडी असू दे. मानमरातब, समाजात चांगली पत असू दे. नोकरीत मोठं पद असू दे. या ऐहीक सुखासाठी, त्याची कितीही कष्ट उपसण्याची तयारी असते. पण ह्या कष्टांना राम नामाची जोड नसते. त्यामुळे त्यांचे कष्ट व्यर्थ जातात. त्यात लहान पणाची भावना आहे. सगळं मी केलं असतो म्हणत राहतो. तिथे रामनाम राहात नाही.

त्यामुळे समर्थ म्हणताहेत की रामनाम आखिरी जे कष्ट केलेत ते व्यर्थ आहेत आणि त्याने शीण होणार. दुसऱ्याकडे आहे माझ्याकडे का नाही अशी इर्षा लोभ माणसाला सतावत राहतो.  अहंकार आला की षड्रिपू आलेच समजा. मग अशा कष्टांचा काय उपयोग? ते व्यर्थ आहेत कारण त्याला राम नामाची जोड नाही.

म्हणून समर्थ पुढे जाऊन म्हणत आहेत की,” जना सारखे व्यर्थ का वोसणावे?”  जना सारीखे म्हणजे इतर अज्ञानी, बद्धं, असमंजस लोक. व्यर्थ म्हणजे बाष्कळ,  निरुपयोगी, अर्थहीन आणि वोसणावे म्हणजे बडबड.

म्हणजे ते म्हणताहेत की, रे मना, तू राम नाम घेता घेता तुझं कर्म करण्याऐवजी बाकीच्या अज्ञानी लोकांसारखं काहीतरी बरळून वेळ वाया का घालवतोस? बाष्कळ बडबड यामध्ये निंदानालस्ती, चुगल्या करणं, चार लोकांविषयी वाईट बोलत राहणं, शिव्याशाप देणं, स्वतःचे कर्तृत्व सांगत राहणं, दुसऱ्याला अपमानास्पद बोलणं, हे असं बोलून तुझा वेळ वाया तर नाही ना घालवत आहेस? हया बोलण्यातून तुला कसलंही समाधान मिळणार नाहीये.  आनंद प्राप्त होणार नाहीये.

तर तू इतर मूर्ख लोकांच्या सान्निध्यात राहून, त्यांच्या सारखा तर वागत बोलत नाहीयेस ना? ज्याने की कसलेही तुझं भलं होणार नाहीये.  तुझी उन्नती होणार नाहीये.  त्यापेक्षा तू स्वतःवर लक्ष केंद्रित कर. संत सज्जन आणि परमेश्वराच्या सान्निध्यात राहा. त्यात तुला ऊर्ध्व गती मिळेल.

पुढे समर्थ म्हणताहेत की, “सदा सर्वदा नाम वाचे वसो दे” म्हणजे परमेश्वराचं नाम सदा सर्वदा तुझ्या वाणीतून येऊ दे. सतत त्या परमेश्वराचं नाम तुझ्या मुखी राहू दे.  तुला नेमून दिलेला कर्म तर तू खरच पण सोबत रामनाम सदोदित तुझ्या मुखी असू दे.  नामस्मरणाची जोड तुझ्या सत्कर्मा सोबत असू देत.

ह्याने काय होईल तर, तुझ्या मध्ये अहंकार निर्माण होणार नाही. “अहंता मनी पापिणी ते नसो दे”  हे मी केलं, ते मी केलं, अशी अहंकाराची भावना राहणार नाही.  एकदा तुमच्या मुखात राम नाम असेल तर, अहंकाराचा मागमूसही तुमच्या मध्ये राहणार नाही आणि एकदा अहंकार संपला की मग, “मी तू पणाची बोळवण होईल” आणि तू परमेश्वराशी एकरूप होऊन, तुझी ऊर्ध्वगती साधशील.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.