Manobodh by Priya Shende Part 47 : मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 47 (Manobodh by Priya Shende Part 47)
मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे
जनी जाणता भक्त होऊनी राहे
गुणी प्रीती राखे क्रमु साधनाचा
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा

 

याआधीच्या श्लोक 28 ते 37 मध्ये शेवटचं चरण “नुपक्षी कदा रामदासाभिमानी” हे घेऊन रचना केली होती. त्यात त्यांनी खऱ्या भक्ताची भगवंत कधी उपेक्षा करत नाही, असं समजावून सांगितलं होतं.  तसंच श्लोक 38 ते 42 या श्लोकाच्या चौथ्या चरणात “मना सज्जना राघवी वस्ती कीजे” अशी रचना केली होती, आणि मनाला कायम राघवाच्या ठायी राहण्यास सांगितलं.
आता श्लोक 47 ते 56 या दहा श्लोकाच्या संचात, “जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा” हे शेवटचं चरण घेऊन रचना केली आहे. या श्लोकामध्ये त्यांनी अशा भक्तांचा वर्णन केले आहे, ज्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झालाय.  भगवान त्यांना कळला आहे.
समर्थ सांगताहेत की या जगामध्ये (Manobodh by Priya Shende Part 47) जो जाणता भक्त होऊन राहतो. त्याला सतत डोळ्यांसमोर श्रीहरी दिसतो. नुसता दिसत नाही तर मनामध्ये पण तो भगवंतच असतो. म्हणून तर ते म्हणताहेत की, “मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, ज्यांनी जाणता भक्त होऊनी राहे”.

आता हा जाणता भक्त कोण? ज्याचे आचार-विचार कर्म भगवंताठायी, राघवाठायी आहे तो जाणता भक्त.  ज्याला सगुण-निर्गुण भक्तीच्या उपासनेचं महत्त्व कळतं, तो जाणता भक्त.  ज्याला आपलं कर्म हे भगवंताने दिलेलं आहे, हे कळतं तो जाणता फक्त. जो नवविधाभक्ति मनापासून करतो, जी सगुणभक्ति आहे.
श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन.. हे झाले नवविधाभक्ति चे प्रकार.  यातल्या कोणत्याही प्रकाराने सगुणभक्ति ची सुरुवात करून, निर्गुण भक्ति कडे मार्गस्थ होणं हे महत्त्वाचं असतं.  असा जाणता भक्त किंवा साधक निश्चितपणे सगुणाकडून निर्गुणाकडे मार्गस्थ होत असतो.  इतकेच नाही तर, त्याला सगुण उपासनेचे महत्त्व माहीत असूनही, तो सगुण उपासना करतो, आणि इतरांना पण त्यासाठी मार्गदर्शन करतो.
लहान मुलांना जसं सायकल शिकवताना, सुरुवातीला सायकलच्या दोन्ही बाजूला छोटी चाकं आधारासाठी लावतात, की तो पडू नये.  आणि तो एकदा शिकला की ती चाकं, काढून टाकतात.  तसंच सगुण भक्तीने  अध्यात्माची सुरुवात करून हळूहळू निर्गुण भक्ती कडे वाटचाल करावी.
असा हा जाणता भक्त जो जगात धन्य होतो, आणि तोच खरा सर्व सर्वोत्तमाचा अर्थात भगवंताचा खरा भक्त ठरतो. हनुमंत किंवा विभीषण हे सुद्धा प्रभू श्रीरामांचे आवडते दास होते.  म्हणून तर त्यांना चिरंजीवित्व मिळालं.  असे भक्त माणसातल्या सद्गुणांची वाढ करतात आणि सामान्य पुरुषाकडून असामान्य पुरुषाकडे वाटचाल करतात. स्वतः रामदास स्वामी पण रामाचे भक्त होते, आणि त्यांनी अकरा मारुतींची स्थापना केली. जेणेकरून सगुणभक्तिला सुरुवात व्हावी.
असे भक्त जगामध्ये धन्य होतात आणि तेच भक्त परमेश्वराचे लाडके होतात.  आपणही त्या भगवंताचे लाडके भक्त होऊ या.
जय जय रघुवीर समर्थ
प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.