Manobodh by Priya Shende Part 52: क्रमी वेळ तो तत्त्व चिंतानुवदे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 52 (Manobodh by Priya Shende Part 52) :

क्रमी वेळ तो तत्त्व चिंतानुवादे

न लिंपे कदा दंभभावे विवादे

करी सुखसंवाद जो उगमाचा

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा

या श्लोकात (Manobodh by Priya Shende Part 52) परमेश्वराचा म्हणजे सर्वोत्तमाचा भक्त कसा असतो किंवा आपण कसं असायला हवं की, जेणे करून आपण परमेश्वराचे लाडके भक्त होऊ हे सांगितला आहे. अजून काही लक्षणं आपण बघूयात.

पहिल्या चरणात समर्थ म्हणत आहेत की, “क्रमी वेळ तो तत्त्व चिंतानुवादे.” प्रत्येक माणसाची आपले म्हणून एक दिनचर्या असते.  त्यात आपली काम, उपजीविकेसाठी जे काही करतो त्याचा समावेश असतो.  जास्त वेळ  त्याच्यातच म्हणजे, आपल्या व्यवसाय, नोकरी, घर काम ह्यातच जातो.  शिक्षणात जातो.  पण आपण जर विचार केला तर, या परमेश्वराच्या लाडक्या भक्तांचा वेळ कसा जात असेल?  त्यांचा दिनक्रम काय असेल?  तर त्याचे उत्तर समर्थ या पहिल्याच चरणांत देत आहेत.

तर असा भक्त आपला वेळ तत्वचिंतानुवादे म्हणजे.. तत्व याचा अर्थ परमतत्व.  चिंता म्हणजे इथे चिंतन.. आणि अनुवाद म्हणजे लोकांना सांगतो.  याचा अर्थ असा की परतत्त्वाचं गूढ, त्याची भक्ती हे समजून घेण्यासाठी तो चिंतन करतो आणि ते दुसऱ्यांना पण समजावून सांगतो.  त्यांच्यात रुची निर्माण करतो.  इतर माणसांमध्ये असेल तर त्या परमेश्वराचे महत्त्व पटवून देतो.  त्यांना त्या मार्गाला लावतो.  एकटा असेल तर ध्यानधारणा, चिंतनात वेळ घालवेल.

विश्वाची निर्मिती कशी झाली असेल? तो परमात्मा कसा असेल आणि आपण कशाला जन्माला आलेलो आहोत,  हे गूढ उकलण्याचा प्रयत्न करतो.  परमेश्वराशी तादात्म्य साधण्याचा प्रयत्न करतो.  पुढे ते म्हणतात की, “न लिंपे कदा दंभभावे विवादे” म्हणजे स्वतःला लावून घेत नाही.  म्हणजेच स्वतःला गुंतवून घेत नाही. ते कशात? तर दंभभावे विवादे म्हणजे उगीचच्या वादविवादात तो भक्त अडकून पडत नाही.  त्याला माहित असतं की असल्या बाष्कळ वाद-विवादातून काहीही निष्पन्न होणार नाहीये आणि उगीच वेळ वाया जाईल.  असल्या वादविवादात अहंकार असतो.  मी पणा असतो.  त्यामुळे कोणत्याही दांभिक वादविवादात तो पडत नाही. आपला वेळ चिंतनात, ध्यानधारणेत किंवा लोकोपदेश ह्यात तो घालवतो. भगवंत स्तुतीत घालवतो. निरर्थक पोकळ वादात वेळ दवडत नाही.  तो नेहमी सुखसंवादात मग्न असतो.

म्हणून तर म्हणत आहे की, “करी सुखसंवाद जो उगमाचा”. असा फक्त आपल्या मनाशी संवाद करतो आणि स्वतःशीच वाद घालतो.  त्यातलं चांगलं-वाईट ठरवतो,  त्यालाच समर्थ उगमाचा संवाद म्हणतात. चिंतन करत करत, ईश्वराचं म्हणजेच परतत्त्वाचं मूळ शोधत-शोधत उगमाकडे जायचं.  अशाप्रकारे जो आपला वेळ कारणी लावतो,  तोच दास जगामध्ये धन्य होतो.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.