Maval : गडकिल्ले परिसरात गुटखा व सिगारेट विक्रीवर बंदी आणण्याची मागणी

एमपीसी न्यूज – मावळ परिसरात (Maval) अनेक गडकिल्ले आहेत. पावसाळ्यात अनेक पर्यटक त्यांना भेट देण्यासाठी येतात. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडांवर मात्र व्यसनी मंडळी सिगारेटचे झुरके ओढताना किंवा गुटख्यांच्या पिचकाऱ्या मारताना दिसतात. अशा वाईट गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी गडपायथ्यांशी किंवा गडमार्गावर असलेल्या हॉटेल व स्टॉलवर गुटखा, तंबाखू व सिगारेट विक्रीची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मावळ एडव्हेंचर चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मावळ तहसीलदार यांना करण्यात आली आहे.

लेखी निवेदन शुक्रवारी (दि.12) वडगाव मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना देण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विश्वनाथ जावळीकर, महेश राक्षे, समिर वाघवले,संदेश भेगडे, महेंद्र असवले, आकाश वाटोळे, निखील भांगरे आदी उपस्थित होते.

गड किल्ल्यावर (Maval) केवळ हुल्लडबाजी करायला येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. हे लोक गडावरच मद्यप्राशन किंवा इतर व्यसने बिनधास्त करतात. यावेळी स्थानीक नागरिक व शिवभक्त यांच्यात बऱ्याचवेळा वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. हेच वाद काहीवेळा पोलीस ठाण्यापर्यंत जातात. तसेच गडावर फिरण्यासाठी महिला किंवा कुटुंब ही येतात त्यांनाही याचा त्रास होतो.यासर्व गोष्टींना आळा घालायचा असेल तर परिसरात दारू, गुटखा, सिगारेट विक्रीवर बंदी आणणे गरजेचे आहे.

Durga Briged : दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे पिंपरी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे 15 ऑगस्टला महिलांसाठी विविध स्पर्धा

त्यामुळे प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करत मावळ परिसरातील लेण्या, मंदिरे तसेच गडकिल्ल्यांच्या परिसरात दारू, गुटखा, सिगारेट, तंबाखू यांच्या विक्रीवर बंदी आणत या परिसरांचे पावित्र्य राखावे. यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी मावळ एडव्हेंचर चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.