Maval News: जनतेचे प्रेम आणि विश्वास यामुळे यापुढेही आमचाच गाडा पहिला येणार – फडणवीस

एमपीसी न्यूज – जनतेचे प्रेम आणि विश्वास यामुळे 2014 आणि 2019 मध्ये आमचाच गाडा पहिला आला होता, मात्र मागच्या वेळी तीन मार्कलिस्ट जोडून काही मंडळींनी पहिला नंबर मिळवला आणि सर्वाधिक मार्क मिळवूनही आमचा पहिला नंबर गेला. परंतु जनतेने आमच्यावरील प्रेम आणि विश्वास अद्यापही कायम ठेवलेले आहे. त्यामुळे यापुढेही आमचाच गाडा पहिला येणार, असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवारी) मावळ तालुक्यातील इंदोरी येथे व्यक्त केला.

मावळ तालुका भाजप अध्यक्ष रवींद्र भेगडे व रवी शेटे युवा मंच यांच्या वतीने इंदोरी येथे आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या घाटास फडणवीस यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, तालुका प्रभारी भास्कर म्हाळसकर, मालक मालक संघटनेचे आण्णासाहेब भेगडे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोवा विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल फडणवीस यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

फडणवीस म्हणाले की, जनतेने ठरवले की मी पहिला येतोच. शेतकऱ्यांच्या प्रेमाखातर या घाटात माझा गाडा धावला आणि पहिला आला. जनतेने ठरवल्यामुळेच मागील दोन्ही निवडणुकांमध्ये आमचा गाडा पहिला आला होता. यापुढेही आमचाच गाडा राज्यात पहिला येणार, यात शंकाच नाही.

फडणवीस म्हणाले की, अनेक वर्षांच्या संघर्षानंतर बैलगाडा शर्यत सुरू झाली. याचा मला आनंद आहे. जे लोक बैलगाडा शर्यतीवर बंदी आणण्याचा विचार करतात. त्यांनी एकदा मावळात येऊन शर्यती पाहाव्यात व शेतकऱ्यांचा उत्साह पाहावा. केंद्र शासनाच्या प्रयत्नासह राज्यातील भाजप-सेना युतीच्या सरकारने बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. शेतकरी बैलांना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वागवतो. तो त्यांच्याबाबत क्रूर असू शकत नाही. बैल परिवाराचा घटक असतो. बैल धावणारा-पळणारा प्राणी आहे, हे न्यायालयात सिद्ध झाले आहे.

या बैलगाडा शर्यतीत एकूण 230 बैलगाडे सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.