Pimpri News : भारतीय संस्कृती महिलांमुळे अधिक समृद्ध – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज – आयुष्य सुंदर आहे. आयुष्यातून स्त्री जर वगळली तर आयुष्य हे वृक्ष वाळवंट आहे. स्त्री ही संस्कृती आहे, तिच्या मधील सोशिक, शालीन गुणांमुळे भारतीय संस्कृती टिकली आहे इतकेच नव्हे तर अधिक समृद्ध झाली आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड यांच्या वतीने प्रतिभा महाविद्यालय सभागृहात आयोजित केलेल्या विशेष महिला सन्मान पुरस्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक अतुल इनामदार, सिने नाट्य अभिनेत्री भाग्यश्री देसाई, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात इशस्त्ववनाने झाली. मसाप तर्फे कला, साहित्य, सामाजिक, उद्योग, शैक्षणिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांचा ” विशेष महिला सन्मान ” पुरस्काराने गौरव करण्यात आला.

कला क्षेत्र – अमृता ओंबळे, अर्पिता कुलकर्णी, साहित्य क्षेत्र – शोभा शरद जोशी, छाया काँकरिया, सामाजिक क्षेत्र – अनुराधा गोरखे, सरिता साने, उद्योग क्षेत्र – उत्कर्षा कुलकर्णी, कविता गटणे, शैक्षणिक क्षेत्र – निशा बेलसरे, नीलम मेहता, वैद्यकीय क्षेत्र – डॉ दिपाली पाटेकर, डॉ. सारिका वैद्य या पुरस्कारार्थींचा सन्मानचिन्ह, शाल, प्रमाणपत्र, साहित्य दिनदर्शिका तसेच गुलाबपुष्प प्रदान करुन यथोचित गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात सदर पुरस्कारार्थींचा परिचय व कार्याची माहिती असणा-या ‘कार्य पुस्तिकेचे’ पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रमुख पाहुणे अतुल इनामदार, भाग्यश्री देसाई यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. राजन लाखे यांनी मसापचे कार्य व कार्यक्रमाची भुमिका विशद केली. संजय जगताप, माधुरी मंगरूळकर यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. रजनी शेठ यांनी आभार मानले. किशोर पाटील, श्रीकांत जोशी, दत्तू ठोकळे, यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.