Mhanlunge crime: काम सांगितल्याचा कारणावरून दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज : कंपनीत काम सांगितल्याचा कारणावरून चार कामगारांनी दोघांना कंपनीतून बाहेर आल्यानंतर बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी ऍमेझॉन कंपनीच्या गेटवर आंबेठाण येथे घडली.

अनिकेत बंडू पोटे (वय 22, रा. कडूस, ता. खेड), सुरज वारे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत यांनी म्हाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमकार शेवाळे, ओमकार भैय्ये, मिलिंद जाधव, लखन शेवाळे (सर्व रा. शेवाळवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र सुरज वारे कंपनीचे काम झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास कंपनीच्या बाहेर आले. तिथे आरोपींनी त्यांना अडवले. कंपनीत काम सांगणारे तुम्ही कोण. आम्ही आमचे काम करतो. (Mhanlunge crime) तुमची असली ढवळाढवळ कशाला करता असे म्हणून ओमकार शेवाळे याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारले. सुरज वारे भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही दगडाने मारहाण केली. त्यांनतर शिवीगाळ करून आरोपी निघून गेले. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.