Pune : पुण्यातील बेपत्ता युवक बनला छत्तीसगढ मध्ये माओवादी कमांडर

एमपीसी न्यूज- नऊ वर्षांपूर्वी पुणे शहरामधून बेपत्ता झालेला युवक छत्तीसगढ येथील माओवादी संघटनेत सामील झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्तीसगढ पोलिसांनी जाहीर केलेल्या माओवाद्यांच्या यादीमध्ये पुण्यातील युवकाचे नाव आढळून आले आहे. संतोष वसंत शेलार उर्फ विश्वा असे या युवकाचे नाव आहे. रांजनांदगाव या ठिकाणच्या तांडा एरिया कमिटीचा तो डेप्युटी कमांडर आहे असेही छत्तीसगड पोलिसांच्या या यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.

संतोष शेलार हा विश्वा म्हणूनही ओळखला जातो. पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी झोपडपट्टीमध्ये विश्वा रहात होता. नोव्हेंबर 2010 मध्ये तो पुण्यातून बेपत्ता झाला. त्याचा शोध घेतल्यानंतरही न सापडल्यामुळे अखेर तो बेपत्ता झाल्याची तक्रार जानेवारी 2011 मध्ये खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. मात्र संतोष आता माओवादी कमांडर झाल्याची माहिती पुढे आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

छत्तीसगढ पोलिसांनी 25 मार्च 2019 मध्ये असलेल्या परिस्थितीनुसार रांजनांदगावमध्ये होणाऱ्या माओवादी कारवायांबाबत एक माहिती प्रसिद्ध केली. पोलिसांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये विश्वाचे नाव असून तो महाराष्ट्रातील पुण्याचा नागरिक आहे अशी नोंद करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण 14 नावे आहेत. संतोष उर्फ विश्वा आता माओवादी कमांडर झाल्याचे वास्तव समोर आले आहे. नववीपर्यंत शिक्षण घेतलेला शेलार हा चांगली चित्र काढत असे. शेलार कबीर कला मंचाशी संबंधित असल्याची माहिती देखील पुढे आली आहे. तो हरवल्याची तक्रार जानेवारी 2011 मध्ये दाखल करण्यात आली होती. नोव्हेंबर 2010 मध्ये घर सोडून जाताना आपण दोन महिने एका कामासाठी मुंबईला जात आहोत असे त्याने सांगितले होते. पण तो कधीच परत आलाच नाही. त्याचप्रमाणे याच कालावधीमध्ये प्रशांत कांबळे हा ताडीवाला झोपडपट्टीमध्ये राहणारा आणखी एक युवक देखील याच दरम्यान पुण्यातून गायब झाला होता. तोदेखील शेलार याच्या प्रमाणेच माओवादी झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.