Mission Begin Again: मंडई, तुळशीबाग सुरू; आता ग्राहकांची प्रतीक्षा

Mission Begin Again: Mandai, Tulshibagh opens in pune from today, Now shopkeepers waiting for customers

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सुमारे अडीच महिन्यांपासून बंद असलेली  पुणेकरांची महत्वपूर्ण असणारी तुळशीबाग बाजारपेठ आणि महात्मा फुले भाजी मंडई शुक्रवारपासून (दि.5) सुरू झाली आहे. या भागातील व्यावसायिकांनी उत्साहाने आणि मोठ्या अपेक्षेने आपली दुकाने उघडली आहेत. आता या भागातील व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टनसिंग पाळून व्यवसाय करण्यात येणार आहे. मागील अडीच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे या भागातील व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने व इतर अधिकाकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर हा परिसर खुला करण्यात आला आहे.

नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. लक्ष्मी रोडवरील दुकानेही सुरू झाली आहेत.

त्यामुळे तुळशीबाग बाजारपेठ आणि मंडई सुरू करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली होती. त्यावर महापालिका आयुक्त शेखर यांनी निर्णय घेऊन व्यावसायिकांना दिलासा दिला.

तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनचे सचिव नितीन पंडीत यांनी महापालिका आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला.

कोरोनाच्या महामारीमुळे गेली अडीच महिने जनजीवन ठप्प होते. बाधीत क्षेत्र सोडून उर्वरित भागातील दैनंदिन जीवन सुरू करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध शिथील केले.

परंतु, तुळशीबाग व मंडई ही अति गर्दीची ठिकाणे असल्याने तो बाधीत भाग जरी नसला तरी प्रशासन तेथे व्यवसाय करण्यास परवानगी देत नव्हते. अशा परिस्थितीत हेमंत रासने यांनी पुढाकार घेऊन मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा केली.

अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, उपायुक्त माधव जगताप यांच्यासोबत प्रत्यक्षात तुळशीबाग व मंडईची पाहणी करून त्याचे नियोजन कसे करता येईल याबाबत चर्चा केली.

स्थानिकांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाईल, असा विश्वास त्यांना दिला. पोलीस प्रशासनाशी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सकारात्मक विचाराने तुळशीबागेतील दुकाने व पथारी व मंडईतील व्यावसायिकांना मनपाच्या नवीन अध्यादेशात अटी व शर्तीवर व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सध्याच्या परिस्थितीची जाणीव ठेवून आम्ही व्यापारी मनपाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच व्यवसाय करू, फिजिकल डिसन्टसिगचे नियम पाळू, असे तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशनचे सचिव नितीन पंडित यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.