Maval News : अतुल भातखळकर यांनी माहिती घेऊन बोलावे; समाजात तेढ निर्माण करु नये – आमदार शेळके

एमपीसी न्यूज – लोहगडावर न झालेल्या उरुसाची अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करु नये, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले. अतुल भातखळकर यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी माहिती घेऊन बोलावे तसेच पुन्हा असे वक्तव्य केल्यास त्यांनी मावळात येऊन दाखवावे, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशी संतप्त प्रतिक्रिया शेळके यांनी दिली.

आमदार अतुल भातखळकर यांनी एका वृत्तवाहिनीवर केलेल्या आरोपानंतर आमदार सुनील शेळके यांनी वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जुने व्हिडिओ समाजमाध्यमांवर पसरवून लोहगडावरील उरुस आमदार सुनील शेळके यांनी आयोजित केल्याचा आरोप काही समाजकंटक करत आहेत ते चुकीचे असल्याचे शेळके म्हणाले.

अभिनेत्री कंगना राणावत हिची हुजरेगिरी करणारे भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले आहेत. चार लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार भातखळकर यांनी जबाबदारीने वक्तव्य करायला पाहिजे. कंगनाची हुजरेगिरी करणाऱ्या भातखळकर यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवु नये. न झालेल्या उरुसाची अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा शेळके यांनी भातखळकर यांना दिला.

राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियम अटींचे पालन आम्ही करत आहोत. अफवा पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करु नये. तसेच, प्रसार माध्यमांनी देखील खातरजमा न करता चुकीची बातमी प्रसारित करु नये,’ असे आवाहन आमदार शेळके यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.