Pune News : पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागात 41 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज – महावितरणकडून पुणे परिमंडल अंतर्गत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरु करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या महिन्याभरात पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील 40 हजार 853 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

मागील महिन्याभरात पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 4 हजार 853 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये पुणे शहरातील 21 हजार 347, पिंपरी चिंचवड शहरातील 5 हजार 650 तसेच हवेली ग्रामीण, मुळशी, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर, मावळ व खेड तालुक्यातील 13 हजार 856 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. थकबाकीदार ग्राहकांकडे बिलाची थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे.

सद्यस्थितीत पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच हवेली ग्रामीण भागासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी व वेल्हे तालुक्यातील घरगुती 7 लाख 37 हजार 360 ग्राहकांकडे 157 कोटी 46 लाख, वाणिज्यिक 1 लाख 802 ग्राहकांकडे 53 कोटी 83 लाख व औद्योगिक 16 हजार 467 ग्राहकांकडे 25 कोटी 29 लाख रुपयांची थकबाकी आहे. ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.