Union Budget 2022 : केंद्रीय अंदाजपत्रकात मध्यमवर्गाला दिलासा नाही – मोहन जोशी

एमपीसी न्यूज – साथीच्या काळात औषधांवरील खर्च, उत्पन्नात झालेली घट, महागाईचा तडाखा बसलेल्या मध्यमवर्गाला केंद्रीय अंदाजपत्रकात कोणताच दिलासा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

मध्यमवर्गाला आयकरात सवलत मिळण्याची अपेक्षा होती, ती अपेक्षा फोल ठरली आहे. कोविडच्या साथीच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाले, नोकऱ्या गेल्या, काहींना निम्म्या पगारावर काम करण्याची वेळ आली. अनेक सर्वेक्षणांमधून असे दिसून आले आहे की मध्यमवर्ग मोठ्या संख्येने गरिबीच्या खाईत लोटला गेला. त्यातच जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, साथीच्या काळात औषधांसाठी करावा लागणारा खर्च यामुळे मध्यमवर्ग जर्जर झाला आहे. पुण्यासारख्या शहरात मध्यमवर्गाचे प्रमाण जास्त आहे. या वर्गाला मंत्र्यांचे भाषण नको तर कृती हवी होती. त्याबाबत अंदाजपत्रकाने निराश केले आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करू असे आश्वासन सत्तेवर येताना दिले होते. प्रत्यक्षात नवीन रोजगारसंधी निर्माण झाल्या नाहीत उलट 3 कोटी नोकऱ्या मोदी यांच्या राजवटीत कमी झाल्या. सरकारी नोकरभरती होत नाही आणि मोदी सरकार 60 लाख रोजगार निर्माण झाल्याची आकडेवारी देऊन जनतेची दिशाभूल करीत आहे.तरुणांचे नोकरीचे स्वप्न धूसर करणारा आणि उद्योगपती ‘ मित्रां ‘वर सवलतींची खैरात करणारा आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.