Monsoon Update : पुण्यात पहिल्याच पावसात झाडपडीच्या 30 घटना

एमपीसी न्यूज : पुण्यात शुक्रवारी झालेल्या पहिल्या पावसाने (Monsoon Update) शहरात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. मात्र, दुसरीकडे या पहिल्याच पावसात शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडपडीच्या 30 घटना घडल्या आहेत. तर कर्वे रस्त्यावरील एका हॉस्पिटलच्या पाठीमागे भिंत कोसळल्याने अकरा वाहने, पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात झाड कोसळल्याने 25 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. शिवाय पहिल्या पावसात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी देखील साचले आहे.  
शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि पाहता पाहता पावसाला सुरुवात झाली. अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणार्‍या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, दुसरीकडे सोसाट्याचा वारा आणि पाऊस यांच्या मोठ्या सरीमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठमोठी झाडे उन्मळून पडली. तर, काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तोडून रस्त्यावर पडल्या होत्या. पुणे पोलीस आयुक्तालय शेजारी एक मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडले. त्यामुळे काही वेळ संपूर्ण रस्ता बंद राहिला. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकींवर हे झाड  पडल्याने वीस ते पंचवीस दुचाकींचे यावेळी मोठे नुकसान झाले.

दरम्यान पहिल्या पावसानंतर (Monsoon Update) अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या आणि फांद्या तोडून रस्त्यावर पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात यासंबंधीचे कॉल आल्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन रस्ता मोकळा करण्यास प्राधान्य दिले. दुसरीकडे शहराच्या काही भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आपली दुचाकी काढताना नागरिकांना कसरत करावी लागली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.