Moshi : मोशीकरांचे पुनर्वसन डेक्कन जिमखान्याला करणार का..?

माजी नगरसेवक अरुण बो-हाडे यांचा पुणे महापालिकेला पत्राद्वारे प्रश्न

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेने त्या शहरातील कचरा टाकण्यासाठी मोशीमधील नियोजित सफारी पार्कची जागा मिळावी, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला आहे. त्यामुळे मोशीच्या नागरिक संतप्त झाले असून ही जागा देण्यास येथील नागरिकांनी नकार दर्शविला आहे. महापालिकेच्या या निर्णयावर माजी नगरसेवक अरुण बो-हाडे यांनी मोशीकरांचे पुनर्वसन डेक्कन जिमखान्याला करणार का ? असा प्रश्न पत्राद्वारे केला आहे. तसेच या पत्रात त्यांनी या निर्णयाचा निषेध करीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. 

या पत्रात बो-हाडे यांनी म्हटले आहे,” ज्या कुणा पुणेकराच्या सुपिक डोक्यातून ही कल्पना आली असेल त्याचे कौतुकच करावे लागेल! जे जे सुंदर, ते माझे घर..! बाकी सारे मस्त कलंदर..! या वृत्तीने पुणेकर कसे वागतात ? आपल्या शहरातील कचरा दुसऱ्या शहरात कसा काय टाकावा वाटतो ? डेक्कन सारखा परिसर, मॉडेल कॉलनी सारखे प्रभात रोड, आपटे रोड सारखे नाही, किमान आहे त्या वातावरणात तरी आंम्हाला राहू द्या.

गेली दहा वर्षे पुण्याचा कचरा धुमसत आहे. खरे तर यापूर्वीच याचा गांभिर्याने विचार करून पुणे मनपाने योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता. पिंपरी-चिंचवड शहर आता कुठे आकारास येऊ लागले आहे. या शहरातील कचरा मोशीतच पडत आहे. त्याची विल्हेवाट लावताना येणाऱ्या दुर्गंधीने आधीच मोशीकर बेजार झालेत. कचराडेपोच्या दीड- दोन कि.मी. परिसरातील लोक आधीच हैराण झाले आहेत. माशा आणि तत्सम किटकांच्या होणाऱ्या त्रासाने गंधर्वनगर, संतनगर, बोऱ्हाडेवाडी वगैरे परिसरात रहावेसे वाटत नाही. याच परिसरात आता मोठ-मोठे गृहप्रकल्पही उभे राहत आहेत. आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाचा प्रकल्पही अगदी शेजारीच साकारतो आहे, असे असताना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याला आणि बुद्धिमान पुणेकरांना कचऱ्यावर दुसरी काही उपाययोजना करता आली नाही, हे विशेष आहे.

त्यातूनही पुणे महापालिकेचा हट्टच असेल तर त्यांनी सर्व मोशीकरांचे स्थलांतर पुण्यात डेक्कन जिमखाना परिसरात प्रभात रोड, भांडारकर रोड, आपटे रोड या ठिकाणी करावे. तसेच येथील सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानप्रबोधिनी व एस.पी. महाविद्यालयात शिक्षण द्यावे, असे असेल तर आंम्हाला या प्रस्तावाचा विचार करता येईल.  अन्यथा, मोशीकर नागरिक कधीही पुण्याचा कचरा इकडे येऊ देणार नाही.”

कचरा डेपोच्या त्रासाने बाधित नागरिकांसह याविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी पत्रातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.