Pimpri News : बहुआयामी व्यक्तीमत्व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे – घोडके

एमपीसी न्यूज – साहित्यिक, भाषा शुद्धी चळवळ चालवणारे कुशल संघटक, विज्ञान निष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्वज्ञ, राजकारणी, कवी, वकील, कुशल वक्ते आणि विचारवंत अशा अनेक स्वरुपात समाजासमोर आलेले व्यक्तीमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होय. अशा बहुआयामी व्यक्तीमत्वाचे जीवनचरित्र आपण अभ्यासले पाहिजे, असे प्रतिपादन महापालिका सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला महापालिका सहाय्यक आयुक्त घोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त घोडके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमावेळी जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, महापालिका कर्मचारी वासिम कुरेशी, दीपक पवार, संदीप बहिरट, शीतल पवार, मारुती मारणे, मानसिंग गायकवाड, हेमा शिंदे, अनिल घाडगे, सुरेश मोरे, लक्ष्मन तितकारे, दिलीप गावडे, पत्रकार प्रमोद गरड आदी उपस्थित होते.

सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके यांनी सावरकरांचा जीवनपट उलगडला. ते म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सावरकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगली. काव्यरचना यावर त्यांचे प्रभुत्व होते. मातृभूमीबद्दल असलेली तळमळ ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या काव्यातून सावरकरांनी व्यक्त केली. अशा प्रतिभावंत व्यक्तीमत्वाचे जीवन आपण अभ्यासले पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.