Mumbai: राज्यात एका दिवसात 354 कोरोनामुक्तांना रुग्णालयातून डिस्चार्ज – राजेश टोपे

राज्यात नवे 841 रुग्ण, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 15,525 वर

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आज (मंगळवारी) दिवसभरात राज्यातील 354 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिलासा आणि धीर मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात 228 रुग्ण काल घरी गेले. त्यापाठोपाठ पुणे मंडळात 110 रुग्णांना पाठविण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना, करोनाबाधितांचा आकडाही वाढत आहे. आज दिवसभरात 841 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 34 जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या 15 हजार 525 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 354 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 2,819 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याने बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्यानेही चाचण्या मोठ्या प्रमाणावर होऊन रुग्णांचे निदान वेळेत होत आहे.

राज्यात नऊ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर 23 मार्चला पहिल्यांदा पुणे येथील रुग्णांना घरी सोडण्यात आले त्यानंतर दररोज राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. काल सोमवारी पहिल्यांदाच 350 रुग्णांना घरी सोडले. त्यानंतर आज मंगळवारी 354 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. त्यामध्ये मुंबई महापालिका क्षेत्रातील 165, ठाणे 3, ठाणे मनपा 11, नवी मुंबई मनपा 14, कल्याण डोंबिवली मनपा 7, वसई-विरार मनपा 23, रायगड 3 तर पनवेल मनपा येथील 2 असे मुंबई मंडळात एकूण 228 रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे मनपा 72, पिंपरी-चिंचवड मनपा 14, सोलापूर मनपा 22 तर सातारा येथील 2 असे पुणे मंडळात एकूण 110 रुग्णांना घरी सोडले. अमरावती मनपा 1, बुलढाणा येथे 1 तर नागपूर मनपा क्षेत्रात 10 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

सध्या राज्यात एकूण प्रयोगशाळा असून त्यापैकी 25 शासकीय आणि 20 खासगी प्रयोगशाळा आहेत. दररोज त्यांच्या माध्यमातून सात हजारपेक्षा जास्त चाचण्यांची क्षमता आहे. कालपर्यंत राज्यात पावणे दोन लाख नमुन्यांपैकी 1 लाख 62 हजार नमुने निगेटीव्ह आले आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.