Pimpri News : महापालिकेच्या डॉक्टर, नर्सला प्रशिक्षण देणार,अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे कर्मचारी वर्ग कमी आहे. आहे तो वर्ग प्रशिक्षित नाही. त्यासाठी महापालिकेच्या सर्व डॉक्टर, नर्सला प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिकेची वैद्यकीय सेवा अधिक सक्षम केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर रुग्णसेवेचा सर्वाधिक ताण पडतो. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शहर परिसरातील अन्य रुग्णालयांचा विस्तार आणि नवीन रुग्णालयांचे बांधकाम केले. थेरगाव, आकुर्डी, जिजामाता आणि भोसरी येथे रुग्णालय बांधले. या चार रुग्णालयांत प्रसूती विभाग, अतिदक्षता विभाग, जनरल ओपीडी, बालरोग विभाग, सोनोग्राफी या सुविधा सुरू केल्या आहेत. ही रुग्णालये चोवीस तास सुरु केली आहेत. अतिरिक्त आयुक्त ढाकणे आणि वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी रुग्णालयांची दोन दिवस पाहणी केली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ”महापालिकेच्या कर्मचा-यांसाठी ताथवडे येथे प्रशिक्षण केंद्र करण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या डॉक्टर, नर्स यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिकेच्या रुग्णालयात येणा-या रुग्णाला खासगी रुग्णालयापेक्षा दर्जेदार सुविधा दिल्या जात आहेत. रुग्णाला टॅग आणि रुग्णाच्या नातेवाईकाला व्हिजीटर पास दिला जाणार आहे. नवीन चार रुग्णालये चोवीस तास सुरु केली आहेत. रुग्णालये चोवीस तास सुरु ठेवण्यासाठी कोणत्या अडचणी येत आहेत का, रुग्णालयाचे काम कसे सुरु आहे. याची माहिती घेतली. सुरक्षेच्या आढावा घेतला. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांना आवश्यक ती साधने दिली जाणार आहेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.