Pimpri News: प्रत्येक प्रभाग बदलणार, निवडणूक लांबणीवर जाईल का? महापालिका आयुक्त म्हणतात…

एमपीसी न्यूज – महापालिकेने निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा सादर केलेला कच्चा प्रारुप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडून जशाच तसा स्वीकारला जात नाही. कच्या आराखड्याची तपासणी स्वत: निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान करत आहेत. ते राज्याचे मुख्य सचिव होते. त्यांच्याकडून बारकाईने आराखड्याची तपासणी करण्यात आली. ते बदल सूचवितात, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. चार प्रभागाच्याऐवजी तीन सदस्यांचा एक प्रभाग होणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग बदलणार असून आराखडा कधी जाहीर होईल, हे सांगता येणार नाही. निवडणुका लांबणीवर जातील काय याबाबतही काही माहित नसल्याचे आयुक्त यावेळी म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या प्रभाग रचनेचा कच्च्या प्रारुप आराखड्यात राज्य निवडणूक आयोगाने काही बदल सुचविल्याचे सांगितले जात होते तसेच आराखडा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली केल्याचे आरोप झाले होते.

त्याबाबत आयुक्त पाटील यांनी आज (गुरुवारी) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्वच्छपणे, जबाबदारीने आणि राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रभाग रचना करणे ही आयुक्तांची जबाबदारी असते. प्रभाग रचना कोणी बघितली आहे का? व्यवस्थित केली नाही असे कसे काय कोणी म्हणता येईल?, आम्ही प्रभाग रचना व्यवस्थित केली नसल्यावर निवडणूक आयोग कसा स्वीकारेल?, जोपर्यंत प्रभाग रचना जाहीर होणार नाही, तोपर्यंत आम्ही व्यवस्थित केली नाही असे कसे काय म्हणता येईल?

प्रत्येक आराखडा जशाच तसा स्वीकारला जात नाही. कच्च्या आराखड्याची तपासणी स्वत: निवडणूक आयुक्त करत आहेत. बदल सूचवितात. त्यांना मान्य असेल तरच ते आराखडा स्वीकारतात. चार प्रभागाच्याऐवजी तीन प्रभाग होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभाग बदलणार आहे. नवीन प्रभाग तयार होणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचना व्यवस्थित झाली नाही असे म्हणना-यांनी कोणत्या आधारावर झाली नाही हे सांगावे.

हरकती सुचना घेण्याची संधी आहे. प्रभाग रचना करताना भौगोलिक सीमा पाळल्या आहेत. ब्लॉक तोडले नाहीत. जनतेसाठी आराखडा कधी जाहीर होईल हे सांगता येणार नाही. निवडणुका लांबणीवर जातील काय याबाबत विचारले असता त्याबाबत काही माहिती नसल्याचे आयुक्त पाटील म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.