Pimpri News : महापालिकेची गुरुवारी सर्वसाधारण सभा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा येत्या गुरुवारी (दि. 16) दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेसमोर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी अनुदान देणे, जाहिरात होर्डिंगचे नवे धोरण, यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई, एकरकमी थकबाकी भरल्यास मालमत्ताधारकांना सवलत देणे हे प्रमुख विषय आहेत.

महापालिकेची आगामी निवडणूक आचारसंहिता लागल्यास ही सभा चालू पंचवार्षिकेतील अखेरची सभा ठरणार आहे. सभेसमोर एकूण 13 विषय आहेत. राज्य शासनाच्या सूचनेवरून महापालिकेने इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून, तसे नवीन धोरण आखले आहे. इंदौर शहराप्रमाणे शहरात जाहिरात होर्डिंगचे धोरण तयार केले आहे. मात्र, आयुक्तांचा हा प्रस्ताव विधी समितीने दप्तरी दाखल करण्याची शिफारस सभेकडे केली आहे.

गेल्या सभेत तहकूब केलेल्या शहराचे दोन भाग करून यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई करणे, मालमत्ताकराची एकरकमी थकबाकी भरल्यास त्यांना विलंब दंडात सवलत देणे, चिखलीतील टीपी स्कीमसाठी दोन ठिकाणची जागा ताब्यात घेणे, जिजामाता रुग्णालयाचा शस्त्रक्रिया कक्षातील विद्युत व्यवस्थेसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यास 1 कोटी 78 लाख 55 हजार खर्चास प्रशासकीय मान्यता देणे, थेरगाव रुग्णालयासाठी विद्युत आणि वातानुकुलित यंत्रणा, टेलिफोन कामासाठी 3 कोटी 25 लाख खर्चास मान्यता देणे हे विषय आहेत.

तसेच पीएमपीएलचे 114 कर्मचारी महापालिका आस्थापनेवर वर्ग करणे, पीएमपीएलच्या भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्रात सीमा भिंत, डांबरीकरण, ड्रेनेज, सर्व्हिस पिटसह वर्क शॉप, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी कामांसाठी अर्थसंकल्पात 3 कोटी निधीचे वर्गीकरण करणे आदी विषय आहेत. औंध येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवासस्थान विश्रामगृह, वाहनतळ, उद्योग, गॅरेज, संरक्षण भिंत बांधण्यास प्रशासकीय मान्यता देणे, क्षेत्रीय कार्यालयाचा स्थापत्य भांडवली खर्चाच्या अर्थसंकल्पात नवीन कामे काढण्यासाठी तरतूद वर्ग करण्यास मान्यता देणे आदी 13 विषय सभेच्या विषयपत्रिकेवर आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.