Pimpri News : महापालिका आजपर्यंतच्या ओबीसी लोकप्रतिनिधींची माहिती मागासवर्ग आयोगाला पाठविणार

एमपीसी न्यूज – ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठीचा विषय राज्यात गाजत आहे. त्यानुसार इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोगाने हाती घेतले असून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून देखील स्थापनेपासूनची माहिती मागविण्यात आली आहे. आजपर्यंतच्या ओबीसी लोकप्रतिनिधींची माहिती आठ दिवसांत पाठविण्यात येणार असल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र आयोग स्थापन केला आहे. या आयोगाने माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार पिंपरी -चिंचवड महापालिकेलादेखील पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रानंतर आवश्यक माहिती जमा करण्यासाठी महापालिकेचा निवडणूक विभाग कामाला लागला आहे.

इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महापालिकेच्या स्थापनेनंतर झालेल्या 1986 च्या पहिल्या निवडणुकीपासून ते 2017 पर्यंतच्या निवडणुकीची माहिती गोळा केली जात आहे. निवडणुकीत किती उमेदवार उभे होते? किती उमेदवार निवडून आले? निवडून आलेले उमेदवार आरक्षणाच्या कोणत्या प्रवर्गातून निवडून आले? आरक्षणाची पद्धत? प्रवर्गनिहाय आरक्षित कसे होते, यांसह इतर माहिती आयोगाने मागविली आहे. ही माहिती एकत्र करण्याचे काम सुरू आहे. येत्या आठ दिवसांत ही आयोगाला पाठवाली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.