Pimpri News : महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा होणार ‘ऑफलाइन’!

एमपीसी न्यूज – कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने राज्य सरकारने पुन्हा महापालिकेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहातून घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे तीन महिन्यांनी पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात सभागृहातून होणार आहे. रुग्णसंख्या घटली असतानाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधा-यांकडून नियमांवर बोट ठेवत ऑनलाइन सभा घेतली जात होती. आता राज्य सरकारने ‘ऑफलाइन’ सभा घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा सभागृहातील आसन क्षमतेच्या 50 टक्केप्रमाणे सदस्यांच्या उपस्थित होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 फेब्रुवारी 21 पासून कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली. मार्च, एप्रिल, मे महिन्यापर्यंत लाट तीव्र होती. जूनमध्ये रुग्णसंख्या कमी होऊ लागली. त्याचदरम्यान 28 जून रोजी राज्य सरकारने महापालिका सभा ऑनलाइन घेण्याचे आदेश दिले. जूननंतर रुग्णसंख्येत घट होऊ लागली. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली नाही. रुग्णसंख्या स्थिर राहिली.

रुग्णसंख्या कमी असतानाही सत्ताधारी भाजपने सर्वसाधारण सभा ऑनलाइनच घेतल्या. त्यासाठी राज्य सरकारच्या पत्राचा आधार दिला. सर्वसाधारण सभेचे सभागृह बंद ठेवले. महापौर दालनातून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरची सभा घेतल्या. पदाधिकारी ,गटनेते त्यांच्या केबिनमधून, काही नगरसेवक स्थायी समिती सभागृहातून तर, काही नगरसेवक आपल्या घरुन ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ‘ व्दारे सभेत सहभागी होत.

सभाकामकाज करताना अनेक तांत्रिक अडचणी येत.  कोण विषय वाचतेय, कोण उपसूचना मांडतेय, कोण बोलत आहे हे काहीच लक्षात येत नव्हते. ऑनलाइन सभेचा फायदा घेत भाजपकडून उपसूचनांचे वाचन केले जात नव्हते. सप्टेंबर महिन्याच्या सभेत चार विषयाला तब्बल 27 उपसूचना दिल्या. त्यातील अनेक उपसूचनांचे वाचन केले नाही. दफ्तरी दाखल केलेला  शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या विषय पुनरुज्जीवित केला. यावरुन विरोधकांनी भाजपवर आरोप केले होते.

आता राज्य सरकारने ऑफलाइन सभा घेण्यास परवानगी दिली. महापालिकेला राज्य सरकारचे पत्र 5 ऑक्टोबरला प्राप्त झाले. त्यामध्ये 50 टक्के क्षमतेने प्रत्यक्ष सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याची सभा प्रत्यक्षात सभागृहातून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत बोलताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, “सभागृहातून प्रत्यक्षात सर्वसाधारण सभा घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. सभागृहाच्या  आसन क्षमतेनुसार सभागृहातील उपस्थितीबाबत सदस्यसंख्या निश्चित करण्यात येणार आहे. 50 टक्के सदस्यांच्या उपस्थितीत ऑक्टोबर महिन्याची सभा होईल. उर्वरित नगरसेवक ऑनलाइन सभा कामकाजात सहभागी होतील”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.