Chakan News : पाईप आणि दगडाने मारून माजी प्रियकराचा खून; विद्यमान प्रियकराला अटक

एमपीसी न्यूज – लग्न झालेल्या एका व्यक्तीने लग्नानंतर देखील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेवले. काही कालावधीनंतर तरुणीने व्यक्तीला सोडून एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु केले. हा प्रकार व्यक्तीला माहिती झाल्याने त्याने तरुणाला समजावले. त्यांच्यात वादही झाला. त्यानंतर दोघांनी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी भेटण्याचे ठरवले. मात्र भेटल्यानंतर चर्चेदरम्यान झालेल्या वादातून विद्यमान प्रियकराने माजी प्रियकराचा लोखंडी पाईप आणि दगडाने मारून खून केला. हा प्रकार 29 एप्रिल रोजी भांबोली येथे घडला.

संजय वासुदेव पाटील (रा. शिक्षक कॉलनी, चाकण) असे खून झालेल्या प्रियकर व्यक्तीचे नाव आहे. प्रेम सिद्धार्थ उघडे (वय 19, रा. भांबोली, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन भावाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय पाटील यांचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. लग्न झालेले असतानाही त्यांनी एका तरुणीसोबत प्रेमसंबध ठेवले. काही कालावधीनंतर तरुणीने पाटील यांना सोडून आरोपी प्रेम याच्यासोबत प्रेमसंबंध सुरु केले. हा प्रकार पाटील यांना समजल्याने त्यांनी प्रेम याला 28 एप्रिल रोजी समजावले. मात्र त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर दोघांनी 29 एप्रिल रोजी भेटून याबाबत चर्चा करण्याचे ठरवले. त्यानुसार पाटील यांच्या दुचाकीवरून प्रेम आणि त्याचा अल्पवयीन भाऊ भांबोली येथील एका कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत गेले. तिथे त्यांच्यात वाद झाला आणि दोघांनी मिळून पाटील यांना लोखंडी पाईप व दगडाने मारून त्यांचा खून केला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांना घटनास्थळावर एक आधारकार्ड मिळाले. त्यावरून त्यांनी मयताची ओळख पटवली. त्यांच्याबाबत माहिती काढली असता त्यांचे पूर्वी एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरु असल्याचे समजले. त्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांचा 28 एप्रिल रोजी एकासोबत वाद झाल्याचे समोर आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून प्रेम आणि त्याच्या अल्पवयीन भावाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानुसार प्रेम याला अटक करून दोघांना महाळुंगे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.