Pimpri News : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेकडून बिनबुडाचे आरोप – नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – शिवसेना नेते सचिन अहिर यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना फक्त येऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणुका डोळयासमोर ठेवुन त्यांनी बिनबुडाचे आरोप करुन स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा पलटवार भाजपचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहराचा कायापालाट करणारी पाच कामे सांगावीत. त्याच सत्कार करु असे आव्हान शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी दिले होते. त्याला प्रत्युत्तर देताना ढाके म्हणाले, आघाडी सरकारची 10 कामे दाखवा आम्ही तुमचे भर चौकात अभिनंदन करु. अहिर यांनी अगोदर शहरात फेरफटका मारुन किंवा पिंपरी-चिंचवड स्मार्ट ‍सिटी मध्ये संचालक असलेल्या त्यांच्याच शिवसेनेच्या सदस्याला विश्वासात घेऊन स्मार्ट ‍सिटीच्या कामाबाबतची माहिती घेतली असती तर त्यांना पत्रकार परिषद घेऊन भाजपावर खोटे नाटे आरोप करण्याची वेळ आली नसती.

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे यांच्यासह शासनामधील प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी अध्यक्ष आहेत. शिवाय आय.ए.एस. / आय.पी.एस दर्जाचे अधिकारी संचालक आहेत. शिवसेना नेते सचिन अहिर यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना फक्त येऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणुका डोळयासमोर ठेवुन त्यांनी फक्त बिनबुडाचे आरोप करण्याची स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातुन आम्ही शहराचे पुढच्या तीस वर्षाचे नियोजन करुन शहर विकासाची कामे मार्गी लावत आहोत. यावर शहरातील जनतेचा निश्चितच आमच्यावर विश्वास आहे. आणि याच विश्वासाच्या जोरावर पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येणार यांचा अचुक अंदाज आल्यामुळे शिवसेनेच्या व विरोधकांच्या पायाखालची वाळु सरकली आहे.

यांच्याकडे आरोप करण्यासाठी कसलाही मुद्दा नाही केवळ स्टंटबाजी करण्यासाठी आता बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. अहिर यांनी पत्रकार परिषदेत आम्ही पाच वर्षात केलेली पाच कामे दाखवावीत असा आरोप केला आहे. खरंतर ज्यांना आपले दहा नगरसेवक निवडून आणता येत नाही त्यांनी अशी विचारणा करावी म्हणजे हे हास्यास्पद असल्याचे ढाके म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.