Sangavi News : राज्य सरकारच्या मोकळ्या जागा सीमाभिंत घालून बंदिस्त करा; महापौरांची मागणी

एमपीसी न्यूज – सांगवी येथील जलसंपदा विभागाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमणे होत असून अस्वच्छतेमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी त्या मोकळ्या जागांना सीमाभिंत घालून बंदिस्त करावे, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. दरम्यान, पालकमंत्र्यांनी त्याबाबत संबंधित अधिका-यांना निर्देश देऊन तातडीने कार्यवाही करण्याची सूचना दिल्याचे महापौर  ढोरे यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आदी उपस्थित होते.

याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे असेही महापौर ढोरे यांनी यावेळी सांगितले.  जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने समन्वय साधून कामे पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या असल्याचेही त्या म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.