Pimpri News: महापालिका निवडणुकीत शरद पवार यांनी घातले लक्ष, 16 ऑक्टोबरला घेणार मेळावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहरात जातीने लक्ष घातले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी पवार यांच्या उपस्थितीत शहरातील माजी नगरसेवकांची बैठक तर, 16 ऑक्टोबर रोजी पक्षाचा मेळावा घेण्याचे निश्चित झाले आहे.

महापालिकेतील भ्रष्टाचार आणि आगामी महापालिका निवडणुकीची व्ह्युवरचना ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांची आज (गुरुवारी) भेट घेतली. सत्ताधा-यांकडून विविध विकासकामांमध्ये होणा-या भ्रष्टाचाराची माहिती दिली. पवार साहेबांनी सुध्दा पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहरात यावे, ही मागणी करण्याकरीता आमदार अण्णा बनसोडे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते तसेच माजी नगरसेवकांच्या शिष्ठमंडळाने त्यांची भेट घेतली.

दरम्यान, सत्ताधा-यांनी केलेल्या भ्रष्टाचारासह विकासकामांच्या सर्वच मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. माजी महापौर आझम पानसरे, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, जगदीश शेट्टी, माजी उपमहापौर मोहम्मद पानसरे, माजी नगरसेवक शामराव वाल्हेकर, रामआधार दारिया, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेद्वारे शहरात भ्रष्टाचाराचा सुकाळ झाला असून नागरिकांच्या पैशांवर दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात आहे. प्रत्येक विकासकामांच्या निविदेत जवळच्या व्यक्तीला किंवा नातेवाईकाला सहभागी करून सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी चुकीची कामे करत आहेत. कोविड काळातील मास्क, औषधे, ऑक्सिजन, पीपीई किट व तत्सम खरेदी, नदी सुधार प्रकल्प, अमृत योजना, कच-याचे बायोमायनिंग, यांत्रिक पध्दतीने रस्ते सफाईची निविदा, स्मार्ट सिटीतील खोदाई असेल अथवा शैक्षणिक खरेदी आदी कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. हा भ्रष्टाचार रोखून यात सहभागी असणा-या अधिकारी व सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नेत्यांनी केली. तसेच महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सर्वजण जीवाचे राण करू, असे माजी आमदार लांडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.