सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Vadgaon Maval : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प मावळातून गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मोर्चा

एमपीसी न्युज – मावळ तालुक्यात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे गुजरातला गेला असल्याचा घणाघात करत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.१५) निषेध मोर्चा काढण्यात आला. वडगाव शहरातील पोटोबा महाराज मंदिरापासून तहसिलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला. हा प्रकल्प पुन्हा मावळ तालुक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी अध्यक्ष बबनराव भेगडे,महिला तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल शिंदे, पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके,पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर,जि प सदस्या शोभाताई कदम,सुवर्णाताई राऊत, रूपालीताई दाभाडे, तळेगाव शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश काकडे,माजी अध्यक्ष गणेश आप्पा ढोरे,ग्रामीण ब्लॉक माजी अध्यक्ष सुभाषराव जाधव, नगराध्यक्ष मयुर ढोरे, मंगेश काका ढोरे,तालुका खादीग्रामोद्योग अध्यक्ष अंकुश आंबेकर,संघटनमंत्री नारायण ठाकर,तालुका युवक अध्यक्ष किशोर सातकर, चंद्रकांत दाभाडे, पंढरीनाथ ढोरे,अतुल राऊत, शिवाजी असवले,संजय बावीसकर,माजी सरपंच दत्तात्रय पडवळ,प्रकाश आगळमे, विजय सातकर, अनिल मालपोटे,प्रवीण ढोरे, अतुल वायकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हा निषेध मोर्चा वडगाव शहरातील पोटोबा महाराज मंदिरापासून तहसिलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. मोर्चा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’, ‘५०खोके महाराष्ट्रातील युवकांना धोके,’ असे निदर्शनाचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्याचे मागणीचे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, दिड लाख कोटींची गुंतणूक करणारा वेदांता-फॉक्सकॉन सारखा प्रकल्प मावळातून गेला हे दुर्दैव आहे.हा प्रश्न फक्त मावळपुरता किंवा पुणे जिल्हा पुरता मर्यादित नसून महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.यामुळे हा प्रकल्प पुन्हा मावळात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून या संदर्भात पुढील काळात होणाऱ्या आंदोलनात एक संघटना म्हणून खंबीरपणे प्रतिकार करा.

रविकांत वरपे (राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष) –  वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात निर्माण होणारा रोजगार शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातला पाठविला आहे.हे महाराष्ट्रातील गरीब,कामगार, शेतकऱ्यांचे सरकार नसून गुजरातच्या जनतेचे सरकार आहे.

आमदार सुनिल शेळके :- वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प तालुक्यातून गेल्याने आजचा दिवस बेरोजगार तरुणांसाठी काळा दिवस आहे. हा प्रकल्प पुन्हा मावळात आणण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे.

गणेश खांडगे (राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष) :- मावळ तालुक्याचे देशाच्या व राज्याच्या विकासात मोलाचे योगदान आहे. यामुळे सरकारने येथील युवकांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेऊन मावळ तालुक्यावर अन्याय करू नये.

spot_img
Latest news
Related news