Pimpri News: चले जाव… चले जाव… भ्रष्टाचारी भाजपा चले जाव… राष्ट्रवादी काँग्रेसचा शुक्रवारी महापालिका भवनावर भव्य मोर्चा 

एमपीसी न्यूज:पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने जनतेचा विश्वासघात केला आणि करदात्या जनतेची प्रचंड लूट केल्याने आता विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. गेल्या पाच वर्षांतील असंख्य प्रकऱणांचा पंचनामा करायचा विडाच राष्ट्रवादीने उचलला आहे. स्मार्ट सिटीसह सगळी भ्रष्टाचाराची प्रकऱणे लोकांसमोर आणायची आणि भाजपाचा बुरखा फाडायचा यासाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजता महापालिका भवनावर एका भव्य मोर्चाचे आयोजन कऱण्यात आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज प्रसिद्धीपत्रातून दिली आहे.

चले जाव भ्रष्टाचारी भाजपा चले जावो, असा नारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. चिंचवड स्टेशन ते महापालिका भवनापर्यंत हा मोर्चा होणार आहे. समन्वयक योगेश बहल, कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, राहुल भोसले, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष प्रा. कविता आल्हाट, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, पक्षाचे आजी-माजी आमदार, माजी महापौर, आजी-माजी नगरसेवक, सर्व नेते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला, युवक, विद्यार्थी सेलचे सर्व पदाधिकारी, सर्व आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. भाजपाच्या काळातील बोगस एफडीआर घोटाळा, स्थायी समितीच्या रिंग, रस्ते खोदाई प्रकऱणात आमदारांची बघ्याची भूमिका, कोरोना काळातील स्पर्श हॉस्पिटलने केलेली लूट, कुत्र्यांच्या नसबंदीतील लूट, शिक्षक भरती प्रकरणातील लूट, स्थायी समिती अध्यक्षांची लाचखोरी, पॅरा मेडिकल भरतीतील खंडणी अशा शेकडो प्रकऱणांची कुंडलीच राष्ट्रवादीने तयार केली असून भाजपाला सळो की पळो करून सोडणार आणि त्यांचा खरा जातीयवादी चेहरा जनतेसमोर आणणार आहोत, असे अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे.

भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त शहर कऱणार, असा नारा देऊन शहराचा या लोकांनी पुरता सत्यानाश केला आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराचा अगदी कहर झाला. पाच वर्षे जनतेच्या पैशांची लूट केली. गेल्या पाच वर्षांतील एक एका प्रकरणांची उजळणी करून भाजपाला आरसा दाखवायचा आणि सत्तेतून पायउतार होणे भाग पाडायचे. लोकांनाही आता पटले की, आपण भाजपाला मते देऊन मोठी चूक केली आहे. लोकांनीसुध्दा या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन गव्हाणे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.