Maval News : लहान नागरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संतोष भेगडे विजयी; भाजपला धक्का

एमपीसी न्यूज – पुणे महानगर नियोजन समिती (पीएमआरडीए) च्या सदस्यपदाच्या निवडणुकीत लहान नागरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष मारुती भेगडे निवडून आले. त्यांनी अरुण भेगडे, विजय वढणे यांचा पराभव केला. भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याने आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

पुणे महानगर नियोजन समिती निवडणूक 2021 च्या मावळ ग्रामीण मतदार संघ व लहान नागरी मतदार संघात बुधवारी 100 टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज (शुक्रवारी) झाली. मावळ विधानसभा मतदारसंघातील लोणावळा, तळेगावदाभाडे नगरपरिषदेत भाजपची सत्ता आहे. या दोनही नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेला एकही नगरसेवक नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी लक्ष घातले होते. त्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

प्रतिष्ठेच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष भेगडे यांनी बाजी मारली. त्यांना 57 मते मिळाली. विजय वढणे यांना 52 मिळाली. तर, अरुण भेगडे यांना केवळ 2 मतांवर समाधान मानावे लागले. 113 मतांपैकी 2 मते बाद झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.