Pune : मंत्रिमंडळात आहे, तोपर्यंत पुण्याच्या विकासात राजकारण नाही – अजित पवार

दोन दादा एव्हिएशन गॅलरीच्या उद्घाटनासाठी एकत्र

एमपीसी न्यूज – मंत्रिमंडळात आहे, तोपर्यंत पुण्याच्या विकासात राजकारण करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असावे. पुणे शहरात वैद्यकीय महाविद्यालय होण्यातच जमा आहे, असा विश्वासही त्यांनी महापौरांकडे व्यक्त केला. मुळा-मुठा नद्या पुनरुज्जीवन याची परवानगी तातडीने पूर्ण होईल. दरम्यान, कार्यक्रम पत्रिकेत चारची वेळ देण्यात आली होती. तर, माझ्या कार्यालयात साडेचारपर्यंत आले तरी चालेल, असे सांगितले, असे प्रकार यापुढे करू नये, जी वेळ दिली, तीच सांगावी. अर्धा तास पुणेकरांना थांबावे लागले, त्याबाबत दिलगिरी व्यक्त करत असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील सरसंघचालक बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीचे उद्घाटन सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, राज्यसभेच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण, आमदार सिध्दार्थ शिरोळे, विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, सभागृह नेते धीरज घाटे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ज्योत्स्ना एकबोटे, जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, नगरसेविका नीलिमा खाडे, नगरसेवक आदित्य माळवे, बाबुराव चांदेरे, सचिन दोडके, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना सर्वोपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, अशा प्रकारच्या गॅलरी सर्वच जिल्हास्तरावर निर्माण व्हावे. त्यामुळे वैमानिक तयार होतील. जगामध्ये कोरोनाचे मोठे संकट आहे. मी कोणाच्या हातात हातच देत नव्हतो. तुम्हीही खबरदारी घ्या. केंद्र, राज्य शासनाने याची नोंद घेतलेली आहे. भिवंडीला काय प्रकार घडला. अशा माणसांना जेवढी कडक शिक्षा देता येईल, तेवढी द्यावी. आज कितीतरी एअरवेज बंद पडत आहेत. एअर इंडिया प्रचंड तोट्यात आहे. पुण्यात नवीन एअरपोर्ट झालेच पाहिजे. बजेटमध्ये कमी रक्कम असली तरी मुख्यमंत्र्यांकडून रक्कम वाढवून घेऊ. तसेच, तालुकपातळीवर धावपट्टी होण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी बजेटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. बाहेरच्या बाहेर वाहने गेली तर प्रदूषण कमी होईल. वाघोली, लोणीकाळभोर, चांदनी चौक, निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पुण्याच्या समस्या केवळ महापालिका नव्हेच राज्य शासन, केंद्र शासनाची मदत घेऊन सोडविण्यात येणार असल्याचेही पवार यांनी निक्षून सांगितले.

ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना जगातील वैमानन क्षेत्रातील माहिती व तंत्रज्ञान याचे ज्ञान देण्याच्या उद्देशाने ‘एव्हिएशन गॅलरी’ हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. विमानांविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नेहमीच एक कुतुहल असते. विमान तसेच वैमानन उद्योगात असलेल्या रोजगाराच्या विविध संधी याविषयी सर्वांगीण व शास्त्रशुद्ध माहिती देणारे कायमस्वरूपी प्रदर्शन ‘एव्हिएशन गॅलरी’ या प्रकल्पा अंतर्गत उभारण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्या बंद असलेल्या शाळा क्रमांक 14 च्या आवारातील दर्शनी भागातील बंद असलेल्या शाळेच्या 4 मजली इमारतीमध्ये ही ‘एव्हिएशन गॅलरी’ आहे. ही गॅलरी उभारण्यासाठी माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके यांची मदत झाल्याचेही त्या म्हणाल्या.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, सर्वांगीण विकास होण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहे. लहान मुलांपासून जेष्ठ नागरिकांना विमानांचे कुतूहल असते. शास्त्रशुद्ध पद्धतीने या ठिकाणी माहिती मिळणार आहे. बंद पडलेल्या शाळेचा यासाठी उपयोग करण्यात आला. बाळासाहेब बोडके म्हणायचे आमचे दादा, ज्योत्स्नाताई म्हणायचे आमचे दादा, मी म्हटले आमचे दोन्ही दादा कार्यक्रमाला यावे, आज दोन्ही दादा कार्यक्रमाला आल्याने त्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वच उत्सूक आहोत.
महापालिकेचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय असावे. त्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तो मंजूर करण्यात यावा, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. सध्या शहरात कोरोना संकट गंभीर आहे. तसेच, पंतप्रधान आवास योजना अंतर्गत सव्वालाख घरे द्यायची आहेत. त्यासाठी शासनाने गायरान जमीन द्यावी, असेही ते म्हणाले.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, वैभवी असे आजचे काम झाले. शिवाजीनगर गावठाणात नेहमीच वेगळे काम होतात. स्व. अमराळे यांनी चांगली झाडे लावल्याने त्याचा नागरिकांना लाभ होत आहे. ज्योत्स्ना एकबोटे यांनी सूत्रसंचालन केले. तर, उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.