Pimpri News: महापालिकेचे विभागप्रमुख पूर्व परवानगीशिवाय सोडताहेत मुख्यालय; यापुढे असे केल्यास शिस्तभंगाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील विभागप्रमुख / गट-अ अधिका-यांनी मुख्यालय सोडण्यापूर्वी आयुक्तांची परवानगी घेण्याच्या सूचना दिल्या असतानाही काही विभागप्रमुख / गट-अ अधिकारी कोणतीही पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडतात. त्यामुळे महापालिका प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. यापुढे पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडणाऱ्या विभागप्रमुख, गट ‘अ’ च्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. याबाबतचे परिपत्रक आज (मंगळवारी) जारी केले.

महापालिका आस्थापनेवरील विभागप्रमुख / गट-अ अधिका-यांनी मुख्यालय सोडण्यापूर्वी आयुक्त यांची परवानगी घेण्याबाबत 15 ऑक्टोबर 2013 रोजी परिपत्रकान्वये सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. परंतु, काही विभागप्रमुख / गट-अ अधिकारी कोणतीही पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडतात, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम,1981 च्या नियम 34 अन्वये शासकीय कर्मचा-याचा संपूर्ण वेळ शासनाच्या सेवेसाठी असतो.

या कारणास्तव शासकीय कर्मचा-याने मुख्यालय सोडण्यापूर्वी वरिष्ठांची/कार्यालय प्रमुखांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

विभागप्रमुख / गट-अ संवर्गातील अधिकारी यांनी कोणतीही रजा/सुट्टी/गैरहजेरीमध्ये परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे ही बाब महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 3 चा भंग करणारी आहे. महापालिका आस्थापनेवरील सर्व विभागप्रमुख / गट-अ म्हणून कामकाज करणा-या अधिकारी यांनी मुख्यालय सोडण्यापूर्वी आयुक्त/अतिरिक्त आयुक्त यांची पूर्व परवानगी घ्यावी. परवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये. तसेच नैमित्तिक रजा वगळता इतर सर्व प्रकारच्या रजा घेताना आयुक्त/अतिरिक्त आयुक्त यांचेकडून रजा मंजूर केल्यानंतरच रजेवर जावे.

तसेच कार्यालयीन कामकाजासाठी ज्या अधिका-यांना दौ-यावर जावे लागते, अशा अधिका-यांनी त्यांच्या दौ-याच्या कार्यक्रमास आयुक्त यांची पूर्वमंजूरी घ्यावी. तथापि, शासकीय कामासाठी मुख्यालय सोडण्याची परवानगी घेण्यासाठी पुरेसा अवधी नसेल अशा अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत भ्रमणध्वनीव्दारे, SMS किंवा whatsapp व्दारे आयुक्त/ अतिरिक्त आयुक्त यांना कळवावे.

याच नियमांचे पालन इतर अधिकारी व कर्मचारी (गट ब,क,व ड) यांनी देखील करणे गरजेचे आहे. त्यांच्या बाबतीत त्यांचे लगतचे नियंत्रण अधिकारी यांची पूर्वमंजूरी घेणे गरजेचे आहे. जे विभागप्रमुख / गट-अ अधिकारी / कर्मचारी पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडतील त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल. हे परिपत्रक विभागप्रमुखांच्या निदर्शनास आणण्यात यावे, असे आयुक्त पाटील यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.