Night Curfew : नियम धुडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एमपीसी न्यूज – टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे. मी स्पष्ट करतो की, आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचे नाही. शेवटचा घाव कोरोनावर करायचाच अशा निश्चयानं आरोग्याचे नियम पाळायचे आहेत. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘मी गेल्या दोन वर्षांपासून पाहतोय, राज्य सरकारने ब्रेक दि चेन आणि मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून वेळोवेळी नियमावल्या केल्या आणि अंमलात आणल्या. आरोग्याचे नियम पाळण्यात बहुतांश नागरिक उत्सुक होतेआणि आहेत आणि ते पाळतात सुद्धा पण काही मूठभर लोकांच्यानियम न पाळण्याच्या वृत्तीमुळं आणि बेजबाबदार वागण्यामुळं प्रश्न निर्माण होतो. हे यापुढे चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना, आणि पोलिसांना दिले आहेत. हे सर्व आपल्या भल्यासाठीच आहे, लवकर या विषाणूच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी आहे हे लक्षात घ्या.’

‘आपण शाळा- महाविद्यालये परत ऑनलाईन केली आहेत. शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळं आपल्याला मिळालेली ही सुट्टी आहे असं समजून इकडे तिकडे अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका असेही आवाहन मी माझ्या तरुण मित्रांना करतो.”या सगळ्यामध्ये लसीकरण फार आवश्यक आहे. अजूनही लस घेतली नसल्यास लगेच घ्या. आज या विषाणूची तीव्रता आपल्याला जाणवत नसेल किंवा मृत्यू दर कमी असेल तर तो केवळ लसीकरणामुळे आणि सतत मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सवयीमुळे आहे हे लक्षात ठेवा. काही जिल्ह्यांत लसीकरण पुरेसं झालेलं नाही, तिथं रुग्ण संख्या अधिक वाढून रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचं प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे लसीकरण कमी असलेल्या जिल्ह्यांच्या बाबतीत निर्बंध अधिक कठोर करण्याचा पर्याय देखील सरकारकडे आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.