One Day Police Officer : अंध रिना पाटील पोलीस आयुक्त तर ज्योती माने अपर आयुक्त

26 जानेवारी निमित्त एक दिवसाचा पोलीस अधिकारी होण्याचा सर्वसामान्य नागरिकांना बहुमान

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 26 जानेवारी निमित्त एक दिवसाचा पोलीस अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना बनविण्याचा उपक्रम राबविला. त्यात अंध असलेल्या रिना पाटील या एक दिवसाच्या पोलीस आयुक्त, एकल माता ज्योती माने एक दिवसाच्या अपर आयुक्त तर विद्यार्थी दिव्यांशु तामचिकर पोलीस उपायुक्त बनला. या सुखद धक्क्यामुळे पोलीस आयुक्त आणि इतर अधिका-यांचा पदभार स्वीकारणारे तिघेही भारावून गेले.

सर्वसामान्य नागरिकांना पोलीस अधिकारी होण्याचा अनुभव यावा. यामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यात असलेली भीतीची दरी कमी होऊन आदराची भावना वाढीस लागावी. तसेच नागरिकांना देखील पोलिसांची कर्तव्ये, शिस्तबद्ध काम, आव्हाने यांची ओळख व्हावी, यासाठी ‘एक दिवसाचा पोलीस अधिकारी’ हा उपक्रम पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी राबवला.

दुपारी एक वाजताच्या सुमारास हा सोहळा पार पडला. त्यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात वरील तीनही विशेष अतिथी चक्क वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनातून दाखल झाले. तेव्हा स्वतः कृष्ण प्रकाश यांनी त्यांचं स्वागत केलं. तर पोलीस दलातील बँड पथकाने सलामी देत गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर तीघेहीजण कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांना सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या स्थानी विराजमान करत कडक सॅल्युट ठोकून दैनंदिन कार्याला सुरवात केली

दृष्टिहीन असलेल्या रिना पाटील यांना एक दिवसाचा पोलीस आयुक्त बनविण्यात आले. एक दिवसाचा पदभार पाटील यांच्याकडे सोपविताना स्वतः पोलीस आयुक्तांनी पाटील यांना सॅल्युट करून त्यांचे स्वागत केले.

तसेच जिम ट्रेनरचे काम करणाऱ्या ज्योती माने यांच्याकडे एक दिवसासाठी अपर पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोपविण्यात आला. माने यांनी देखील अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सॅल्युट करत त्यांचे स्वागत केले.

पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ यांचा देखील एक दिवसाचा पदभार विद्यार्थी दिव्यांशु तामचिकर याच्याकडे देण्यात आला.

शहर पोलीस दलातील सर्वोच्च स्थानी एक दिवसासाठी का होईना पण काम करता येत असल्याने एक दिवसासाचे तीनही पोलीस अधिकारी भारावून गेले. पोलीस आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त आणि उप आयुक्तांच्या खुर्चीत या तिघांनाही बसवून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि आयुक्त रामनाथ पोकळे यांनी बाजूला बसून त्यांना पोलिसांचे काम समजावून सांगितले.

पोलीस आयुक्त झालेल्या रीना पाटील म्हणाल्या, “या क्षणाचा स्वप्नातही विचार केला नव्हता, आम्ही पूर्णतः अंध असल्याने फक्त पोलिसांबद्दल ऐकू शकतो. मात्र जे ऐकलं ते खरं निघालं. पोलीस खरेच सामान्य माणसाचे मित्र असतात. मी दिल्लीला गेले होते, तेव्हा घरच्यांनी सांगितलं होतं; आधी पोलिसांना भेट. ते तुला व्यवस्थित मार्गदर्शन करतील आणि योग्य पत्त्यावर सोडतील. तसच झालं कुठलाही स्वार्थ किंवा न्यूनगंड न बाळगता पोलीस मदत करतात हे त्यांचं मोठेपण आहे. या पदाची सूत्रे स्वीकारल्यावर एक नक्की सांगावसं वाटतं कायदे कठोर आहेत पण त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे तरच महिला सुरक्षित राहतील.”

अपर पोलीस आयुक्त झालेल्या ज्योती माने म्हणाल्या, “पतीच निधन झाल्यानंतर समाजातील विकृत मानसिकतेचा परिचय झाला. अनेकवेळा हताश झाले. तरुण मुलीचा सांभाळही करायचा होता. अशा परिस्थितीत फक्त पोलिसांनी जगण्याचं बळ वाढवलं. आज जेव्हा हा सन्मान स्वीकारला तेंव्हा अपप्रवृत्तीचा सामना करण्याची ताकद वाढली. कुठल्याही महिलेवर अन्याय झाल्यास तिनेही पोलिसांची मदत घ्यावी. ते आपल्यासाठीच असतात.”

पोलीस उपायुक्त (गुन्हे) झालेला दिव्यांशु तामचिकर म्हणाला, “मी अजून लहान आहे. पण जिथे माझं दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण झालं त्या वस्तीत आजूबाजूला खूप घाण माणसिकतेची लोकं होती. मी अभ्यास करून चांगल्या मार्कानी पास झालो. आता महाविद्यालयात जाईल. आज इथे खोटा पोलीस म्हणून दाखल झालो असलो तरी भविष्यात खूप मेहनत करून मी खराखुरा पोलीस अधिकारी म्हणूनच पोलीस मुख्यालयात दाखल होणार. मला आमच्या समाजाची मानसिकता बदलायची आहे.”

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “कायदे आणि व्यवस्थे पेक्षा संविधान मानणा-या नागरिकांमुळे कुठलाही देश चालतो, प्रगती करतो. आपल्या देशातील लोकशाहीचा गर्व वाटतो. संविधानाने आम्हाला लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता शासन चालविण्याचे उद्धिष्ट दिले. त्याची प्रचिती प्रत्येक प्रजासत्ताक दिनी येतच. मात्र आज हा सोहळा बघताना आम्ही ज्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उभे आहोत. त्यांनाही आमचे काम समजले पाहिजे आणि त्यांनीही आमच्या प्रति संवेदशीलता दाखवली पाहिजे. त्याच बरोबर समाजतील सर्व घटकांबरोबर आम्ही आहोत हे दाखविण्यासाठी हा उपक्रम घेण्याची ठरवलं ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

उपायुक्त सुधीर हिरेमठ म्हणाले, “ज्या विद्यार्थ्याने माझ्या खुर्चीचा पदभार स्वीकारला, त्याला मी फक्त एकच गोष्ट सांगितली. ती म्हणजे, प्रामाणिकपणे जिद्द आणि महिनतीने जे मिळवता येतं तेच चिरकाल टिकतं. त्यातून आपल्या प्रत्येक अडचणीतून यशस्वी मार्ग काढता येतो. त्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात आत्मविश्वास आहे की तो नक्की शिकणार. गरीब लोकवस्तीतील मुलं केवळ गुन्हेगारीकडेच वळतात, हा केवळ गैरसमज आहे. आपण समाज म्हणून अशा परिसरातील होतकरू तरुणांना विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन त्यांचं भविष्य उज्वल करायला हवं.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.