Sports News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मिनी मॅरेथॉन’ शर्यतीचे आयोजन

एमपीसी न्यूज – वैंकटेश ग्राफिटी सहकारी गृहरचना सोसायटी, केशवनगरतर्फे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मिनी मॅरेथॉन’ शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत रविवारी (दि. १४) होणार असून या शर्यतीमध्ये सुमारे 300 हून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती देताना वैंकटेश ग्राफिटी सहकारी गृहरचना सोसायटीचे आणि आयोजक सतीश पाटील, रणजीत लोणकर, सतीश देसाई, ऋतुराज कदम-पाटील, सागर बुर्डे, आशिष सगरे, पंकज मेमाणे, विकी कणसे, मयूर शेळके, विशाल लाहोटी, अमित पाटील यांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली असून या अमृत महोत्सवदिनाच्या निमित्ताने आमच्या सोसायटीच्यावतीने मिनी मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या शर्यतीचे हे उद्धघाटनाचे वर्ष असून निरोगी आरोग्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी याचे आयोजन केले गेले आहे. निरोगी आरोग्य राखण्याचा संदेश याव्दारे देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

शर्यतीच्या स्वरूपाबाबत अधिक माहिती देताना सतीश पाटील, मयूर शेळके, विशाल लाहोटी, अमित पाटील म्हणाले की, केशवनगर येथील वैंकटेश ग्राफिटी सहकारी गृहरचना सोसायटीपासून या मिनी मॅरेथॉनला सुरूवात होणार आहे. केशवनगर येथील मुख्य रस्त्यापासून रेणूका माता मंदिर रस्त्यावरील रेणूका माता मंदिर येथे पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. रेणूका माता मंदिरपासून पुन्हा वैंकटेश सोसायटीपर्यंत असा २ किमीचा टप्पा पूर्ण करून शर्यतीचा समारोप तेथे होणार आहे.

मिनी मॅरेथॉनमध्ये 5 वर्षांपासून वेगवेगळ्या वयोगटातील खेळाडू सहभागी होणार आहेत.10 वर्षाखालील गट, 25 वर्षाखालील गट आणि वरिष्ठ गट अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. 5 वर्षाखालील लहान गटासाठी अर्धा किमी.,युवा गटासाठी 1 आणि 2 किमी अंतराची स्पर्धा होणार आहे. या शर्यतीमध्ये 100 पुरूष तसेच 70 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा कोरोनाच्या नियमांचे तसेच वाहतुक शाखेच्या नियमांचे पालन करून आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व धावपटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार असून प्रत्येक गटाच्या विजेत्या धावपटूंना करंडक, मेडल्स् आणि प्रमाणपत्र मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.