Pimpri News : ऑक्सिजन पुरवठादार ‘गॅब’ला मुदतवाढ, 1 कोटींचा खर्च

स्थायी समितीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – ऑक्सिजन पुरवठादार मे. गॅब एंटरप्रायजेस या संस्थेला निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जम्बो कोविड रुग्णालयास द्रव ऑक्सीजन गॅसच्या पुरवठ्याकामी मुदतवाढ कालावधीकरीता 1 कोटी खर्चास सदस्यपारित प्रस्तावाद्वारे स्थायी समिती सभेत मान्यता दिली आहे.

पीएमआरडीयच्या माध्यमातून पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जम्बो कोविड केअर सेंटर उभारले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे त्याचे संचलन केले जाते. जम्बो कोविड रुग्णालयाकरिता आवश्यक वैद्यकीय ऑक्सीजन ओटू द्रव गॅस पुरवठा करण्याचे काम मे गॅब एन्टरप्रायजेस या संस्थेला दिले होते. या संस्थेची 31 मे 2021 रोजी मुदत संपुष्टात आली.

कोरोना रुग्णांकरिता द्रव ऑक्सीजन गॅसची आवश्यकता असल्याने व निविदा प्रक्रीयेस लागणारा कालावधी विचारात घेता या संस्थेस नवीन निविदा प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. तसेच कोरोना निधी या लेखाशिर्षामधून जम्बो कोविड रुग्णालयास द्रव ऑक्सीजन गॅसच्या पुरवठ्याकामी मुदवाढ कालावधीकरीता 1 कोटीच्या खर्चास स्थायी समिती सभेत सदस्यपारित प्रस्तावाद्वारे मान्यता देण्यात आली.

दरम्यान, या सदस्य पारित ठरावाला सत्ताधारी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी  विरोध केला आहे. कामठे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस धार्जिन ठेकेदाराला अभय दिले जाते. माजी महापौरांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी  धार्जिन ठेकेदाराला पोसण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.