Chakan News : सुरक्षा रक्षकाला मारहाण करत चाकूचा धाक दाखवून महिंद्रा कंपनीत दरोडा घालणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – सुरक्षा रक्षकाला मारहाण करत चाकूचा धाक दाखवून पाच जणांनी मिळून निघोजे येथील महिंद्रा कंपनीत दरोडा घातला. यामध्ये चोरट्यांनी 4 लाख 28 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना तीन ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली. पोलिसांनी तीन दरोडेखोरांना अटक केली आहे.

गौरव विजय सिंग वय 23, पुष्पेन्द्र त्रिवेणी सिंग वय 25, समीरअब्दुल रशिद अख्तर वय 25, तिघे रा. निघोजे, ता. खेड अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्यासह खत्रीलाल पूर्ण नाव माहिती नाही, रा. निघोजे, आसिफ खान पूर्ण नाव माहिती नाही, रा. निघोजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अनुबंध गिरीश श्रीवास्तव वय 40, रा. कुदळवाडी, चिखली यांनी बुधवारी (दि. 4) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 25 जुलै ते तीन ऑगस्ट पहाटे चार वाजताच्या कालावधीत महिंद्रा कंपनीमध्ये घडली. फिर्यादी श्रीवास्तव हे निघोजे येथील महिंद्रा कंपनीत नोकरी करतात. या कंपनीमध्ये प्रवीण पुरुषोत्तम नारखेडे या व्यक्तीला सुरक्षारक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. सुरक्षारक्षक नारखेडे कर्तव्यावर असताना आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन कंपनीच्या कंपाउंडची तार कटरने तोडली. त्यानंतर चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करून चार लाख 28 हजार 474 रुपये किमतीची स्वेटर कॉपर वायर दरोडा टाकून चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.