PCMC : अतिक्रमण कारवाईत जप्त केलेल्या मशीनचा हडपण्याचा डाव? कनिष्ठ अभियंता निलंबित

एमपीसी न्यूज – अतिक्रमण कारवाईत (PCMC) जप्त केलेल्या भोसरी, एमआयडीसीतील एका कंपनीसमोरील बंद अवस्थेतील पाच फोर्क लिफ्ट मशीन जाणीवपूर्वक पाच महिने दुसरीकडे ठेवल्याने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले. त्यांची विभागीय चौकशी सुरु करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले.

संतोष दत्तात्रय शिरसाठ असे निलंबित केलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. शिरसाठ हे क क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे बीट निरीक्षक, अतिक्रमण पथक प्रमुख जबाबदारी सोपविण्यात आली होती. चिखली, मोशीतील, अनधिकृत कच्ची, पक्की घरे, पत्राशेड, हातगाड्या, टप-या, पथारीवाले, फळ विक्रेते, किऑक्सवरील कारवाईसाठी नेमणूक केली होती.

शिरसाठ यांनी भोसरी, एमआयडीसी येथील एका कंपनीसमोर ब-याच वर्षांपासून बेवासरपणे लावलेल्या व बंद अवस्थेत असलेल्या 5 फोर्क लिफ्ट मशिनवर 25 मार्च 2023 रोजी अतिक्रमण कारवाई केली. मशिन हस्तगत केल्या.

या मशिन मोशीतील वाहनतळाच्या ठिकाणी जमा करणे आवश्यक व अभिप्रेत असताना जवळपास पाच महिने विलंबाने म्हणजे (PCMC) 27 ऑगस्ट 2023 रोजी तक्रारीनंतर अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा केल्याचे दिसून येत आहे. यावरु शिरसाठ यांनी कारवाई करताना नियमित सूचनांचे पालन केल्याचे दिसून येत नाही.

Pune : मोठी बातमी! राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लेखक नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फसून केली मारहाण

किंबहुना मशीन जाणीवपूर्वक क क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात ठेवल्याचे निदर्शनास येत आहे. कामकाजातील अनियमितता, तक्रारीच्या अनुषंगाने शिरसाठ यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. पण, त्यांचा खुलासा संयुक्तिक नाही.

त्यांनी कर्तव्यात नितांत सचोटी, कर्तव्यपराणता न राखता गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केले आहे. याप्रकरणी त्यांची सचोटी अत्यंत संशयास्पद आहे. त्यांच्या गैरवर्तनामुळे कार्यालयीन शिस्तीवर गंभीर प्रतिकूल परिणाम होण्याचा संभव आहे. ते प्रत्यक्ष सेवेत राहिल्यास तपासात अडथळा निर्माण होण्याची भिती आहे. त्यामुळे उपलब्ध पुराव्यात फेरफार होऊ नये यासाठी शिरसाठ यांना निलंबित करण्यात आले. त्यांची विभागीय चौकशी सुरु केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.