Pimpri: भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणखी 10 कोटी; स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणखी सुमारे 10 कोटी रुपये देणार आहे. त्याचबरोबर बिगर सिंचन पाणी आरक्षणापोटी दोन महिन्याची पाणीपट्टी म्हणून सुमारे 33 लाख 52 हजार रुपये अनामत रक्कम, तर जलमापक यंत्रासाठी 5 लाख 64 हजार रुपये अदा केले जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता पिंपरी-चिंचवड शहरासाठी राज्य सरकारतर्फे 24 नोव्हेंबर 2019च्या निर्णयानुसार भामा-आसखेड धरणातून प्रतिदिन 60 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण मंजूर केले आहे. त्याअनुषंगाने जलसंपदा विभाग, पुणे मुख्य अभियंता आणि चासकमान पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला इरादापत्र दिले आहे. त्याद्वारे बिगर सिंचन पाणी आरक्षणासाठी दोन महिन्याची पाणीपट्टी अनामत रक्कम म्हणून 33 लाख 52 हजार 610 रुपये आणि जलमापक यंत्रासाठी सुमारे 5 लाख 64 हजार 581 रुपये, तसेच जलमापक यंत्रासाठीच्या किंमतीप्रमाणे 15 टक्के अतिरिक्त कार्यालयीन खर्च म्हणून 84 हजार 687 रुपये स्वतंत्र धनादेशाद्वारे जमा करण्याची मागणी पिंपरी महापालिकेकडे केली आहे.

पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी भामा-आसखेड धरण सिंचन पुर्नस्थापना खर्चापोटी भरावयाची रक्कम माफ करावी किंवा त्याऐवजी 15 लाख रुपये इतकी रक्कम प्रती हेक्टर दराने पुनर्वसन खर्चापोटी प्रकल्पग्रस्त शेतक-यांना अदा करण्यात यावी, असा निर्णय 8 मार्च 2019 रोजी मुंबईतील मंत्रालयात झालेल्या बैठकीत झाला आहे. त्यानुसार याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 15 जून 2019 रोजी 20 कोटी 87 लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाकडे जमा करण्यात आले आहेत. या व्यतिरित भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणखी 10 कोटी रुपयांची मागणी जिल्हाधिका-यांनी केली आहे.

त्याचप्रमाणे बिगर सिंचन पाणी आरक्षणासाठी दोन महिन्याची पाणीपट्टी इतकी अनामत रक्कम म्हणून 33 लाख 52 हजार 610 रुपये आणि जलमापक यंत्रासाठी 5 लाख 64 हजार 581 रुपये, तसेच जलमापक यंत्रासाठीच्या किंमतीप्रमाणे 15 टक्के अतिरिक्त कार्यालयीन खर्च म्हणून 84 हजार 687 रुपये स्वतंत्र धनादेश चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना द्यावा लागणार आहे. त्याअनुषंगाने भामा-आसखेड धरणातील पाणी आरक्षणाबाबत पाटबंधारे विभागाशी करार करणे आवश्यक आहे.

सन 2019-20 ‘पाणीपुरवठा विशेष योजना निधी’ या लेखाशिर्षाखाली ‘पिंपरी – चिंचवड महापालिकेसाठी पाण्याचा अतिरिक्त स्त्रोत निश्चित करणे, त्यातील पाणीसाठा आरक्षित करणे आणि त्या अनुषंगाने कामे करणे’ या कामांतर्गत सुमारे 37 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातूनच भामा- आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक 10 कोटी, तसेच दोन महिन्याची पाणीपट्टी, जलमापक यंत्रासाठी आणि अतिरिक्त 15 टक्के खर्च अशी एकूण 40 लाख 1 हजार 878 रुपये इतकी रक्कम अदा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.