Pimpri: महापालिकेतील ‘अजित पवार’ हेही चर्चेत

दुपारनंतर महापालिकेतून होताहेत गायब!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (दोन)अजित पवार दुपारनंतर महापालिकेतून गायब होत आहेत. अधिकारी, नागरिकांना भेटत नाहीत. दूररध्वनीही घेत नाहीत. त्यांच्याकडे महत्वाचे विभाग असून कामकाजाचा खोळंबा होत आहे. त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदाचा पदभार अद्यापही सोडला नाही. एकाचेवळी दोन्ही पदाचा कारभार ते हाकत असल्याने चर्चेत आले आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बदलीचे वेध लागले आहेत. तर, अतिरिक्त आयुक्त दुपारनंतर गायब होतात. त्यामुळे महापालिकेत सगळे आलबेल आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश करण्यात आल्याने दोन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. रोजगार हमी योजनेचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार यांची 26 जुलै रोजी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी (दोन) बदली झाली. त्यांनी सप्टेंबरमध्ये पदभार स्वीकारला. त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्याकडे पुणे विभागीय जात पडताळणी समितीची जबाबदारी आहे. राज्य सरकारचे तसे आदेश आहेत. त्यामुळे अजित पवार महापालिकेत दुपारपर्यंत थांबतात. दुपारनंतर पुण्यामध्ये जातात. दुपारनंतर अधिका-यांना भेटत नाहीत. महापालिकेत दुस-यादिवशीच येतात. त्यामुळे कामकाजाचा मोठा खोळंबा होत आहे.

अजित पवार यांच्याकडे आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय, कर आकारणी व करसंकलन विभाग, अभिलेख कक्ष, कामगार कल्याण विभाग, सुरक्षा विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, स्थानिक संस्था कर, मध्यवर्ती भांडार विभाग, अतिक्रमण मुख्य कार्यालय (अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभाग), भूमी आणि जिंदगी, क्रीडा विभाग, सर्व क्षेत्रीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग, सभाशाखा हे महत्वाचे विभाग त्यांच्याकडे आहेत. परंतु, ते दुपारनंतर गायब होतात. अधिकारी, नागरिकांना भेटत नाहीत. दूरध्वनी देखील घेत नाहीत. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त (दोन) असून देखील काहीच उपयोग होत नाही. कामाचा खोळंबा होतच आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बदलीचे वेध लागले आहेत. अतिरिक्त आयुक्त (दोन) यांच्याकडे अतिरिक्त जिल्हाधिकारीपदाचा देखील पदभार आहे. त्यामुळे त्यांचे महापालिकेच्या कामकाजाकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा महापालिकेचा कामावर मोठा परिणाम होत आहे. महापालिकेत सर्व आलबेल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.