Pimpri: चौकशी समितीचा निष्कर्ष येण्यापूर्वीच ‘स्थायी’ची पावणे दोन कोटीच्या मास्क खरेदीला मंजुरी

Pimpri: Approval for purchase of masks worth Rs 2 crore before the inquiry committee comes to a conclusion शिवसेनेचा विरोध; मौन बाळगणाऱ्या राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल संशयकल्लोळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा हात गुंतलेल्या एक कोटी 70 लाख रुपयांच्या मास्क खरेदीच्या विषयाला स्थायी समितीने आज (बुधवारी) बिनभोट कार्योत्तर मान्यता दिली. विशेष म्हणजे मास्क खरेदीची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी सुरु आहे. समितीचा निष्कर्ष येण्यापूर्वीच स्थायी समितीने मान्यता दिल्याने भाजपने मास्क खरेदीतील भ्रष्टाचाराला समर्थन दिल्याचा आरोप होऊ लागला आहे.

दरम्यान, विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या चारही सदस्यांनी याबाबत मौन बाळगले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. तर, शिवसेनेने या विषयाला विरोध केला.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राजकीय पदाधिका-यांनी महामारीतही आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. झोपडीधारकांना मास्क देण्याकामी कोणतीही निविदा न मागविता, करारनामा न करता पुरवठाधारकांकडून थेट पद्धतीने कापडी मास्क खरेदी केले आहेत.

एक मास्क दहा रुपयांना खरेदी केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी नगरसेवकांच्या संस्थाकडूनच पंधरा लाख झोपडीधारकांसाठी मास्कची खरेदी केल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे मास्कमधील भ्रष्टाचार शहरात चर्चेचा विषय झाला आहे.

मास्क खरेदीवरून नगरसेवकांनी महासभेतही हल्लाबोल केला. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या काही नगरसेवकांनीही आक्रमक भुमिका घेतली होती. मास्क खरेदीत गैरव्यवहार म्हणजे मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे.

मास्कचा दर्जा, किंमत याची चौकशी करावी. फसवणूक करणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी महासभेत केली होती.

त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मास्कची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती केली. सध्या या समितीचे कामकाज सुरु आहे.

समितीचा निष्कर्ष येणे अद्याप बाकी आहे. या चौकशीत काही निष्पन्न झाल्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगत स्थायी समितीने निर्णय मंजूर करायचा की नाही हे ठरवावे असे आयुक्तांनी सांगितले.

त्यानंतर शिवसेना गटनेता राहुल कलाटे यांनी विरोध केला. तरी देखील कलाटे यांचा विरोध नोंदवून घेत स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांनी एक कोटी 70 लाखाच्या मास्क खरेदीच्या कार्योत्तर मान्यतेच्या विषयाला मान्यता दिली.

दरम्यान, विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या चारही नगरसेवकांनी मौन धारण केले. त्यामुळे त्यांच्या भुमिकेविषयी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

दरम्यान, ‘जे सांगितले ते केले’ अशी प्रतिक्रिया स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.