Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात सहा वेगवेगळ्या घटनांमध्ये एक लाखाच्या दुचाकी पळवल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी, निगडी, हिंजवडी, तळेगाव आणि देहूरोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 2 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी गुरुवारी (दि. 21) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवान गौडा शंकर गौडा पाटील (वय 32, रा. इंद्रायणीनगर भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली. शिवानंद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची एम एच 14 / ए सी 8411 ही दुचाकी मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास आपल्या घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून पार्किंग मधून दुचाकी चोरून नेली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

दत्तात्रय संभाजी डिसले (वय 33, रा. निघोज चाकण) यांनी अज्ञात इसमाविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दत्तात्रय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास दत्तात्रय त्यांच्या एम एच 11 / बी क्यू 2234 या दुचाकीवरून त्यांच्या मूळ गावी सातारा येथे जात होते. ते तुपे वस्ती मोशी येथे आले असता त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे त्यांनी गाडी बाजूला घेतली आणि रस्त्याशेजारी असलेल्या बाकावर बसले. काही वेळाने ते बेशुद्ध झाले. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील सॅमसंग मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

किरण आनंदराव खंडाईत (वय 52, रा. यमुनानगर निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. किरण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 15 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा पर्यंत किरण यांनी त्यांची वीस हजार रुपये किमतीची एम एच 14 / एफ एल 96 71 ही दुचाकी घरासमोर असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोपेड दुचाकी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

गौरव प्रवीण पोसवाल (वय 38, रा. रविवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गौरव यांनी त्यांची दहा हजार रुपये किमतीची एन एच 14 / ई के 1135 ही दुचाकी तळेगाव दाभाडे गावातील राजेंद्र चौकाजवळ असलेल्या संकेत कलेक्शन या दुकानासमोर बुधवारी (दि. 20) रात्री अकराच्या सुमारास पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. गुरुवारी पहाटे साडे बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

अचिंत्य चैलोक्यनाथ दास (वय 69, रा. रामनगर कॉलनी बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचिंत्य यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी त्यांची वीस हजार रुपये किमतीची एम एच 12 / एन व्ही 3622 ही मोपेड दुचाकी बुधवारी (दि. 20) दुपारी दोनच्या सुमारास रामनगर कॉलनीतील सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. दुपारी पावणे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

बसवराज ईरण्णा जवळगी (वय 49, रा. तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. बसवराज यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बसवराज यांनी 16 नोव्हेंबर रोजी रात्री 10 च्या सुमारास त्यांची बारा हजार रुपये किमतीची एम एच 14 / सी एच 5659 ही दुचाकी तळवडे येथील राहत्या घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी बसवराज यांच्या संमतीशिवाय दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.