Pimpri : फळांची विक्री मंदावली, शेतकरी आणि फळ विक्रेत्यांची मोठी आर्थिक हानी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील फळांच्या सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. यामुळे फळ उत्पादक शेतकरी, बागायतदार आणि फळ विक्रेते यांचे आर्थिक नुकसान होत आहे. बंद ठेवलेल्या बाजार समित्या, फळांच्या मालवाहतुकीकडे सरकारी यंत्रणांनी केलेले दुर्लक्ष यामुळे ऐन सीझनच्या काळात शेतकरी आणि विक्रेते यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

लाॅकडाऊन कालावधीत मागचा पुढचा विचार न करता राज्यातील सर्व बाजार समित्यांतील फळांचे व्यवहार बंद करण्यात आले. यामुळे  शेतकऱ्यांनी विक्रीसाठी  नेलेला माल व्यापाऱ्यांना विकत घेता आला नाही. काही भागात विकत घेतलेला माल वाटेतच अडकून पडला. पोलिसांकडून मालवाहतुकीला रोखण्याचा प्रयत्न देशभर झाल्याने परराज्यातून फळांच्या कमिशन एजंटांनी राज्यातील फळ व्यापाऱ्यांना नव्या ऑर्डर दिल्या नाहीत. यामुळे व्यापाऱ्यांनी शेतशिवारातील सौदेही बंद केले. द्राक्ष, केळी, डाळिंब, कलिंगड, खरबूज, मोसंबी, चिकू अशा विविध फळांच्या शिवार सौद्याचे भाव पाडण्यात आले. फळांची विक्री साखळीच तुटल्याने रोज फलोत्पादन शेतकऱ्यांची कोटयवधी रुपयांची हानी होत आहे.

द्राक्ष आणि कलिंगडाची मोठी  हानी 

अचानक बंद केलेलया बाजारपेठा आणि या लाॅकडाऊनमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक, सांगली याठिकाणी द्राक्षांचे मोठे उत्पादन केले जाते.  संचार बंदीमुळे मालाची वाहतूक करता येत नसल्यामुळे व पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे काही शेतकरी द्राक्षाच्या बागा तोडून तो माल जनावरांना घातला जात आहे. तर काही ठिकाणी अगदी कवडीमोल भावाने फळ विक्री केली जात आहे. उन्हाळ्यात कलिंगड आणि द्राक्ष यांना खूप मोठी मागणी असते पण कोरोनाच्या संकटामुळे सर्वच ठिकाणी फळ उत्पादकांना मोठी आर्थिक हानी सहन करावी लागत आहे.

 भाव पडले तरीही आंबा बाजारात उपलब्ध नाही

आंब्याच्या ऐन हंगामात कोरोनामुळे हापूस आंबा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. सर्वाधिक आंबा विक्री असलेल्या मुंबई, पुण्यासारख्या शहरात लॉकडाउनमुळे हापूस आंबा पोहोचू शकत नाही. बाजार समिती बंद असल्यामुळे छोट्या बागायतदाराला आंबा काढणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच या संकटामुळे  आंब्याचे भाव देखील मोठ्या प्रमाणावर खाली घसरले आहेत व बाजारपेठेत आंबा पोहोचू शकत नसल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.

कोरोनामुळे फळांच्या संपूर्ण बाजारपेठ बंद पडल्या आहेत. त्यामुळे फळांची विक्री कमी झाले आहे तसेच कोरोना हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे शक्यतो नागरिक फळ विक्रीकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. – फळ विक्रेता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.