Pimpri : पिंपरीतील साबणाच्या व्यापाऱ्याच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेप

एमपीसी न्यूज – पिंपरी मार्केट येथे साबणाच्या व्यापाऱ्याचा (Pimpri )खून करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे जी डोरले यांनी ही शिक्षा सुनावली. सन 2018 मध्ये ही खुनाची घटना घडली होती.

सचिन यशोदास भालेराव (वय 34, रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. साबणाचे व्यापारी प्रदीप उर्फ बाबू वीरुमल हिंगोराणी (वय 51, रा. पिंपरी मार्केट) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अतिरिक्त सरकारी वकील वामन कोळी यांनी याप्रकरणी (Pimpri )काम पाहिले. त्यांनी 15 साक्षीदार तपासले. शिक्षेसाठी सीसीटीव्ही फुटेज, डॉक्टरांचा मृत्यूची वेळ सांगणारा अभिप्राय, पंचांची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावा महत्त्वाचा ठरला. पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक कोकाटे व हवालदार बी टी भोसले यांनी काम पाहिले.

प्रदीप हे पिंपरी मधील साबणाचे होलसेल व्यापारी होते. त्यांच्या घरी त्यांची आई आणि ते असे दोघेच राहत होते. 2 मे 2018 रोजी सकाळी सातच्या सुमारास घरकाम करणारी मोलकरीण घरी आली. त्यावेळी प्रदीप यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. मोलकरणीने घरात बघितले असता प्रदीप यांच्या आई घरातील समोरच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. मोलकरणीने घरात न जाता शेजारच्या लोकांना याबाबत सांगितले. शेजा-यांनी घरात बघितले असता, प्रदीप स्वयंपाक घरात मृतावस्थेत पडलेले आढळून आले. घरातील काही रक्कम चोरी केल्याने अज्ञात इसमाविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 302 (खून करणे), 201 (पुरावा नष्ट करणे), 380 (घरफोडी चोरी करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Bhosari : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण

तांत्रिक कैशल्य, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्यास अटक करण्यात आली होती. यातील आरोपी हा आर्थिक अडचणीत असताना त्याला पैशाची आवश्यकता होती. त्यावेळी त्याने त्याच्या ओळखीचे प्रदीप हिंगोराणी यांना उसने पैसे मागितले. हिंगोराणी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून आरोपीने हिंगोराणी यांचा गळा आवळून खून केला व त्यांच्या घरातील कपाटातून रोख रक्कम चोरी करून पळून गेला. याबाबत पुरावे प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे आरोपीच्या विरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

खुनाच्या कलमानुसार जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड, पुरावा नष्ट केल्याच्या कलमानुसार तीन वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंड, घरफोडीच्या कलमानुसार पाच वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

हिंगोराणी यांच्या घरातून चोरलेले 38 हजार रुपये आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केले होते. ते पैसे आणि दंडातील 10 हजार रुपये हींगोराणी यांच्या वारसाला देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.